कोलकाता : सौरव गांगुली हा बीसीसीआयचा नवा अध्यक्ष होणार आहे. २३ ऑक्टोबरला गांगुली अध्यक्षपद स्वीकारणार आहे. पण त्याआधीच गांगुलीने विराटबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. गांगुलीचं हे वक्तव्य म्हणजे विराटला नेमका सल्ला आहे का इशारा आहे? अशी चर्चा सुरु झाली आहे.
'येत्या काळात भारतीय टीमने आयसीसी स्पर्धा जिंकण्यावर लक्ष केंद्रीत करावं. कर्णधार विराट कोहलीने याबाबत गांभीर्याने विचार करायला हवा. आम्हाला मोठ्या स्पर्धा जिंकण्यावर लक्ष द्यावं लागणार आहे. तुम्ही प्रत्येक स्पर्धा जिंकू शकत नाही, हे मला माहिती आहे. पण या टीमला अनेक स्पर्धांमध्ये अपयशही आलं आहे, हे विसरून चालणार नाही,' असं गांगुली म्हणाला आहे.
'सध्याची भारतीय टीम माझ्यावेळच्या टीमपेक्षा चांगली आहे. कारण काळाप्रमाणे सध्याची टीम मानसिकरित्या जास्त मजबूत झाली आहे. टीममध्ये प्रतिभेची काहीही कमी नाही. आपण वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पोहोचलो, पण वर्ल्ड कप जिंकता आला नाही. विराटला या दिशेने गंभीरतने विचार करावा लागेल. या गोष्टी बोर्डरुममध्ये होऊ शकत नाही,' अशी प्रतिक्रिया गांगुलीने दिली आहे.
भारताने शेवटची आयसीसी स्पर्धा २०१३ साली धोनीच्या नेतृत्वात जिंकली होती. इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने विजय मिळवला होता. कोहलीच्या नेतृत्वात भारतचा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये आणि वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पराभव झाला होता.