Rohit Sharma Net Worth: टीम इंडियाचा कर्णधार आणि हिटमॅन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माचा आज वाढदिवस आहे. क्रिकेट क्षेत्रात अनेक तरूणांचा रोहित शर्मा रोल मॉडेल आहे. रोहित शर्माने त्यांच्या मेहनतीच्या जोरावर अनेक गोष्टी कमावल्या आहेत. अशातच पैशांच्या कमाईच्या बाबतीत रोहित शर्मा काही कमी नाहीये. आज रोहित शर्माच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रोहित दर वर्षाला किती कमाई करतो ते जाणून घेऊया.
रोहित शर्मा सध्या टीम इंडियाचा कर्णधार आहे. याशिवाय बीसीसीआयने त्याला A+ श्रेणीत ठेवलं आहे. यासाठी बोर्ड रोहितला वर्षाला सात कोटी रुपये पगार म्हणून देते. याशिवाय 15 लाख रुपये मॅच फी बोर्डाकडून मिळते. वनडे सामना खेळण्यासाठी 6 लाख रुपये आणि टी-20 सामन्यासाठी 3 लाख रुपये मिळतात.
गेले अनेक वर्ष रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता. मात्र यंदाच्या सिझनमध्ये या टीमच्या कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली आहे. रोहित शर्मा आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार नसला तरी फ्रँचायझी त्याला 16 कोटी रुपये मानधन देते. रिपोर्ट्सनुसार, रोहितने आयपीएलमध्ये आतापर्यंत 178 कोटी रुपये कमावले आहेत.
रोहित शर्माची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. केवळ देशातच नाही तर जगभरात रोहित शर्माचे चाहते आहे. इंस्टाग्रामवर रोहित शर्माचे 37.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. अशा परिस्थितीत तो इन्स्टा वरूनही भरपूर कमाई करतो. मिळालेल्या माहितीनुसार, तो एका प्रमोशनल इन्स्टा पोस्टसाठी 75 लाख रुपये घेतो. त्याचप्रमाणे रोहित शर्माही जाहिरातींमधून भरपूर कमाई करतो. सध्या तो जवळपास 28 ब्रँडशी जोडला गेलेला आहे. यामध्ये Jio Cinema, Max Life Insurance, Goibibo, CEAT Tyre, Hublot, Usha, Oppo, Highlander सारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. रोहित प्रत्येक जाहिरातीसाठी सरासरी 5 कोटी रुपये आकारतो, अशी माहिती रिपोर्ट्सनुसार समोर आली आहे.
रोहित शर्मा मुंबईत राहत असून त्याचं हे घर आलीशान आहे. सध्या रोहित शर्मा राहत असलेल्या घराची किंमत तब्बल 30 लाख रूपये आहे. याशिवाय रोहितने हैदराबादमध्ये एका बंगला खरेदी केला आहे, ज्याची किंमत जवळपास 5 कोटी रूपये असल्याची माहिती आहे. एकंदरीत माहिती घेतली तर रोहित शर्माचं नेट वर्थ 214 कोटी आहे.