'विराटपेक्षा रोहितच भारी', पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूकडून कौतुक

गेल्या काही वर्षांमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी भारतीय क्रिकेटला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. 

Updated: Jan 14, 2020, 03:39 PM IST
'विराटपेक्षा रोहितच भारी', पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूकडून कौतुक

लाहोर : गेल्या काही वर्षांमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी भारतीय क्रिकेटला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. क्रिकेटमधली अनेक रेकॉर्ड या दोघांच्या नावावर झाली आहेत. विराट आणि रोहित यांच्यात सर्वोत्तम कोण? याची तुलना नेहमीच केली जाते. अनेकवेळा या तुलनेत विराट कोहली उजवा ठरतो. पण पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू झहीर अब्बास यांचं मत मात्र वेगळं आहे. विराट कोहली हा महान बॅट्समन आहे, पण रोहित शर्मा खास आहे. रोहित शर्माला शॉट मारताना बघायला मजा येते, असं झहीर अब्बास म्हणाले आहेत.

'कोहली महान बॅट्समन आहे, पण रोहित शानदार शॉट्स खेळू शकतो. रोहितला शॉट मारताना बघितल्यावर मी संतुष्ट होतो. ज्या पद्धतीने रोहित शॉट मारतो, तशी कला विराटकडे नाही,' असं झहीर अब्बास यांनी सांगितलं.

'कोहली सर्वोत्तम आहे, पण रोहितला बॅटिंग करताना पाहाणं मला जास्त आवडतं, कारण त्याची स्टाईल मला आवडते. जेव्हा रोहित खेळत असतो, तेव्हा मी टीव्ही बंद करत नाही,' असं वक्तव्य झहीर अब्बास यांनी केलं.

भारतीय टीम क्रिकेटच्या सगळ्या फॉरमॅटमध्ये चांगला खेळ करत आहे, कारण त्यांच्याकडे बराच पैसा आहे. तसंच त्यांनी योग्य ठिकाणी काम केलं आहे. घरगुती क्रिकेटमध्ये त्यांनी फारसे फरक केले नाहीत, याचा फायदा त्यांना झाला, असं वक्तव्य झहीर अब्बास यांनी केलं.

भारतात क्रिकेट प्रचंड लोकप्रिय आहे, त्यांनी नेहमीच जगाला महान बॅट्समन दिले. त्यांनी आपल्यासारखं राजकारण केलं नाही. भारताने एक यंत्रणा तयार केली. ही यंत्रणा वरिष्ठ खेळाडूंकडेही लक्ष ठेवते, ज्यामुळे वरिष्ठ खेळाडू आणि त्यांची जागा घेणाऱ्या नव्या खेळाडूंमध्ये फार फरक पडणार नाही. पहिले गावसकर आले, मग तेंडुलकर आणि आता विराट कोहली, असं झहीर अब्बास म्हणाले.