अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपुरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नव्या पोलीस आयुक्तांसमोर देखील ही गुन्हेगारी थांबवण्याचे आव्हान असणार आहे. अशातच नागपूर पोलिसांनी एक मोठी कारवाई करत चोरीला गेलेल्या तब्बल 111 दुचाकी परत मिळवल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे एकाच चोरट्याने दोन वर्षात या 111 दुचाकी चोरल्या होता. पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी आता या दुचाकी परत करण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत.
नागपुरात एका चोरट्याने दोन वर्षांत चक्क 111 दुचाकी चोरून त्यांची नऊ जिल्ह्यांत विक्री केल्याचे उघडकीस आले आहे. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत या बारावी पास वाहन चोराचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी अडीचशेहून अधिक सीसीटीव्ही तपासल्यानंतर आरोपीचा शोध लावला. वाहन चोरीच्या प्रकरणांतील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई ठरली आहे.
ललित गजेंद्र भोगे असे आरोपीचे नाव आहे. 21 डिसेंबर रोजी एक दुचाकी चोरीला गेली होती. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान त्या परिसरातून अनेक दुचाकी चोरी गेल्याची बाब समोर आली. ज्या भागात चोरी झाली तेथील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. पोलिसांनी अडीचशेहून अधिक सीसीटीव्हींचे हजारो तासांचे फुटेज तपासले. त्यात काही ठिकाणी आरोपी ललित भोगे आढळून आला. पोलिसांकडे वाडीपर्यंतच्या सीसीटीव्हीचा ॲक्सेस होता. मात्र त्यानंतर हा आरोपी कुठे जातो हे लक्षात येत नव्हते.
पोलिसांनी सायबर सेलची मदत घेत ई-सर्व्हेलन्सच्या माध्यमातून तपास केला असता ललित कोंढाळीतील असल्याची बाब समोर आली. कोंढाळीत पाहणी केली असता तो सापडला. त्यावेळी त्याच्याकडे संशयित वाहन देखील होते. त्याबाबत विचारणा केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र नंतर ललितने गुन्हा केल्याची कबुली दिली. ललितची कसून चौकशी केली असता व पोलिसी खाक्या दाखविल्यावर तो पोपटासारखा बोलू लागला. ललितने नागपूर, नागपूर ग्रामीण, अमरावती ग्रामीण, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अकोला, भंडारा, गडचिरोली अशा नऊ जिल्ह्यांतून 111 वाहने चोरल्याची कबुली दिली.
पोलिसांनी काय सांगितले?
"जी वाहने मिळाली आहेत त्याव्यतिरिक्त जी वाहने कुठे विकली आहे हे शोधणं कठीण होतं. एकूण नऊ जिल्ह्यांमध्ये 111 वाहने मिळाली आहेत. ही मोठी कारवाई असून याआधी कधीही अशी कारवाई झाली नव्हती. अशा गुन्ह्यांच्या तपास करुन ते सोडवले पाहिजेत. ज्यांची वाहने आहेत त्यांना परत करण्यास सांगण्यात आलं आहे. पोलीस अधिकाऱ्यांची मी बैठक घेतली आहे. आरोपी वाहन चोरी करुन ग्रामीण भागात विकतात. ही सर्व वाहने ग्रामीण भागातून मिळाली आहेत. मी काही करु शकतो असे होता कामा नये. कायदा सुवव्यस्था राखण्यासाठी कारवाई चालू आहे. आरोपी पाळत ठेवून या चोऱ्या करत होता. पार्किंग लॉट, बॅंकेबाहेरच्या गाड्यांना आरोपी लक्ष्य करायचा," अशी माहिती नागपुरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी दिली.