'नरेंद्र-देवेंद्र' म्हणजे विकासाचे डबल इंजिन; महाराष्ट्र पुन्हा एक नंबर होणार- शाह

मी आजवर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री पाहिला नाही.

Updated: Oct 10, 2019, 01:53 PM IST
'नरेंद्र-देवेंद्र' म्हणजे विकासाचे डबल इंजिन; महाराष्ट्र पुन्हा एक नंबर होणार- शाह title=

सांगली: केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस या भाजपच्या डबल इंजिनमुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा वेगाने प्रगतीपथावर वाटचाल करू लागल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केले. ते गुरुवारी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या जत येथील सभेत बोलत होते. यावेळी अमित शहा यांनी आघाडी सरकारच्या १५ वर्षांच्या कारभारावर टीका करताना गेल्या पाच वर्षांतील फडणवीस सरकारचे काम कसे उजवे आहे, हे अधोरेखित करण्याच प्रयत्न केला. 

आघाडीच्या काळात महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा अपवाद वगळता एकही मुख्यमंत्री सलग पाच वर्षे टिकू शकला नाही. काँग्रेसचे दिल्लीतील नेतृत्त्व सातत्याने मुख्यमंत्री बदलत राहायचे. मात्र, नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना सलग पाच वर्षे काम करण्याची संधी दिली. या स्थैर्यामुळे राज्याचा विकास झाला. परिणामी देशात पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दबदबा वाढू लागला आहे. 'नरेंद्र-देवेंद्र' या डबल इंजिनामुळे महाराष्ट्र देशात पुन्हा पहिल्या क्रमांकाचे राज्य होईल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला. 

यावेळी अमित शाह यांनी आघाडी सरकारवरही टीकास्त्र सोडले. आघाडी सरकारच्या १५ वर्षांच्या काळात शरद पवारांनी सांगली आणि महाराष्ट्रासाठी काय केले?, असा सवाल त्यांनी विचारला. आघाडी सरकारच्या काळात केंद्र सरकारकडून राज्याला १,१५,५०० कोटी रूपयांची मदत मिळाली. मात्र, मोदी सरकारच्या काळात ही मदत अडीचपटींनी वाढून २,८६,३५४ कोटीवर पोहोचली, याकडे अमित शाह यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

यावेळी शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांचेही तोंडभरून कौतुक केले. देवेंद्र फडणवीस वयाने लहान असतील, पण मी त्यांच्यासारखा मुख्यमंत्री पाहिला नाही. ते दिवसरात्र राज्याच्या प्रगतीचा विचार करत असतात, असे शहा यांनी सांगितले.

तसेच भाजपच्या प्रचाराचा मुख्य केंद्रबिंदू असलेल्या अनुच्छेद ३७० चा उल्लेखही यावेळी शाहंनी केला. मतांच्या राजकारणासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून अनुच्छेद ३७० रद्द करण्याला विरोध केला. राहुल गांधी यांनी शिव्या द्यायच्या असतील तर आम्हाला द्याव्यात. मात्र, देशाचे तुकडे करण्याच प्रयत्न करू नये. अन्यथा आम्ही देशाचे तुकडे करणाऱ्यांना तुरुंगात टाकू, अशा इशारा शहा यांनी दिला.

तसेच मोदींनी आपल्या कार्यकाळात देशाला सुरक्षित करण्याचे सर्वात महत्त्वपूर्ण काम केले. मौनीबाबा मनमोहन सिंग यांच्या काळात सातत्याने दहशतवादी हल्ले व्हायचे. मात्र, यावेळी उरी आणि पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांना भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. कारण, यावेळी सत्तेवर मौनीबाब मनमोहन सिंग नव्हे तर ५६ इंची छाती असणारे नरेंद्र मोदी होते. यानंतर संपूर्ण जगाचा भारताकडे पाहायचा दृष्टीकोनच बदलून गेला, असेही शहा यांनी सांगितले. 

यापूर्वी भारतीय पंतप्रधान परदेशात गेल्यानंतर विशेष काही घडत नसे. मात्र, मोदी जेव्हा परदेशात जातात तेव्हा त्यांना पाहण्यासाठी हजारोंची गर्दी जमते. हे पाहून काँग्रेसच्या पोटात दुखते. त्यामुळेच ते मोदींच्या परदेश दौऱ्यांवर प्रश्न उपस्थित करत असल्याचे शहा यांनी सांगितले.