निवडणुकीच्या प्रचारसभेत जोरदार वाऱ्याने स्टेज कोसळला! 9 जणांचा मृत्यू; दुर्घटना कॅमेरात कैद

Election Campaign Rally Accident Video: समोर शेकडोच्या संख्येनं समर्थक उमेदवाच्या नावाने घोषणाबाजी करत असतानाच अचानक जोरदार वारे वाहू लागले अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं असं व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 26, 2024, 12:59 PM IST
निवडणुकीच्या प्रचारसभेत जोरदार वाऱ्याने स्टेज कोसळला! 9 जणांचा मृत्यू; दुर्घटना कॅमेरात कैद title=
दुर्घटना कॅमेरात कैद

Election Campaign Rally Accident Video: मॅक्सिकोमध्ये एका दुर्देवी दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जोरदार वादळामुळे स्टेजचा सेटअप कोसळून ही दुर्घटना घडली. उत्तर मॅक्सिकोमधील सॅन पेड्रो गार्झा गार्सिया येथे उमेदवार जॉर्ज अल्वारेझ मायनेझ यांचा प्रचार सुरु असतानाच अचानक वादळी वाऱ्यांमुळे स्टेजसाठी उभारण्यात आलेला धातूचा सांगाडा कोलमडून पडला. ही संपूर्ण दुर्घटना कॅमेरामध्ये कैद झाली असून स्टेज पडल्यानंतरचा गोंधळ आणि उपस्थितांच्या किंकाळ्या, आरडाओरड या व्हिडीओत ऐकू येत आहे.

नेमकं घडलं काय?

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या घटनेच्या कथित व्हिडिओमध्ये मायनेझ स्वत:च्या नावाचा जयजयकार करत असलेल्या गर्दीकडे पाहून भाषण देत असल्याचं दिसत आहे. अचानक त्यांच्या मागी असलेली भल्या मोठ्या आकाराचा डिजीटल डिस्प्ले आणि स्टेजसाठी उभारण्यात आलेला धातूचा वजनदार साचा पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे उडू लागतो आणि गर्दीच्या दिशेने फेकला जातो. कोणाला काही कळायच्या आतच ही स्क्रीन आणि तो साचा समोरच्या गर्दीवर पडतो. वाऱ्याचा वेग आणि दिशा यामुळे स्टेवर उपस्थित असलेल्यांना पळून जाण्याची संधी मिळते आणि त्यांच्यापैकी कोणालाही काहीही दुखापत होत नाही. स्टेवरील लोकांच्या डोक्यावरुन ही स्क्रीन थेट समोरच्या गर्दीवर कोसळताना व्हिडीओत पाहायला मिळत. स्टेजचा काही भाग कोसळल्याचं लक्षात आल्यानंतर काही सेकंदांनंतर मायनेझ स्टेज सोडून धावताना दिसतो.

1)

2)

अपघातानंतर उमेदवार काय म्हणाला?

"सॅन पेड्रो गार्झा येथे झालेल्या अपघातामध्ये जोरदार वाऱ्याने आम्ही उभ्या असलेलं स्टेज कोसळलं. मी सॅन जोस रुग्णालयात आहे. मला कोणतीही इजा झालेली नाही. या ठिकाणी नेमकं काय घडलं याचा पाठपुरावा करण्यासाठी मी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. अपघातात बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांना धीर देणे आणि त्यांची काळजी घेणे, हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे,” असं मायनेझने त्याच्या एक्स अकाऊंवरुन केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या अपघातानंतर मायनेझने निवडणूक प्रचार स्थगित केला आहे. सॅन पेड्रो गार्झा गार्सियाचे महापौर मिगुएल ट्रेविनो यांनी सोशल मीडियावर, "तिथे लोक अडकले आणि जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. पीडितांसाठी मी प्रार्थना करतो," असा संदेश दिला आहे.

मायनेझने आघाडीवर

मॅक्सिकोमध्ये 2 जून रोजी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीबरोबरच राज्य आणि नगरपालिका निवडणुका होणं अपेक्षित आहे. याच निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मागील काही आठवड्यांपासून देशभरात प्रचाराचा धुरळा उठला आहे.  सत्ताधारी मोरेना पक्षाच्या क्लॉडिया शेनबॉम, तसेच विरोधी आघाडीचे उमेदवार Xóchitl Gálvez या दोघांनाही पिछाडीवर टाकत, राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या शर्यतीत मायनेझने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.