अमेरिकेत बापानेच आपल्या 5 वर्षीय मुलीला अत्यंत निर्घृणपे मारहाण करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकंच नाही तर त्याने मुलीच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि आपण काम करत असलेल्या रेस्तराँमध्ये नेले अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे. ॲडम माँटगोमेरी असं या आरोपी पित्याचं नाव आहे. न्यू हॅम्पशायर येथे वास्तव्यास असणाऱ्या ॲडमने मुलीचे कुजलेलं शरीर एका बॅगेत भरलं आणि रेस्तराँसह इतर ठिकाणी जणू काही कचऱ्याची पिशवी आहे अशा पद्धतीने नेलं आणि अखेर फेकून देत त्याची विल्हेवाट लावली. मुलीचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.
34 वर्षीय आरोपी ॲडम माँटगोमेरी हा आचारी आणि डिशवॉशर म्हणून रेस्तराँमध्ये काम करतो. रेस्तराँमध्ये काम करत असताना तो मृतदेहाचे तुकडे असणारे पिशवी फ्रिजरमध्ये ठेवत होता. यावेळी जेवणाचे इतर पदार्थ त्या पिशवीच्याच शेजारी असायचे अशी माहिती कोर्टात देण्यात आली.
"तो पिशवी घेऊन नेहमी कामावर येत होता. रेस्तराँने इतर पदार्थ, साहित्य ठेवलेल्या फ्रिजरमध्ये तो ती पिशवी ठेवत होता. लोकांनी त्याला ती पिशवी ठेवताना आणि काढताना पाहिलं होतं. पण त्यात काय असेल याची कोणाला कल्पनाही नव्हती," अशी माहिती फिर्यादी ख्रिस्तोफर नोल्स यांनी दिली.
मुलगी हार्मोनी 2019 पासून बेपत्ता होती. पण पोलिसांनी दोन वर्षांनी याबद्दल समजलं. ॲडम माँटगोमेरीच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, मुलीने त्यांच्या फॅमिली कारमध्ये दोन वेळा शौच केल्यानंतर ॲडम माँटगोमेरीने तिला एकामागोमाग अनेक ठोसे मारले होत. घऱातून बाहेर काढल्यानंतर कुटुंब बरेच दिवस कारमध्ये वास्तव्य करत होतं.
त्यानंतर तो गाडी चालवायला गेला होता. जेवल्यानंतर त्याने ड्रग्जचंही सेवन केलं होतं. यावेळी मुलगी मागील सीटवर असहाय्यपणे रडत होती. नोल्स म्हणाले की, त्यांची कार बंद पडल्यानंतर काही तासांनंतर या जोडप्याला मुलीचा मृत्यू झाला आहे हे समजलं.
फिर्यादींच्या म्हणण्यानुसार ॲडमने आपल्या मुलीचा मृतदेह मित्राच्या कारच्या ट्रंकमध्ये, त्याच्या सासू-सासऱ्यांच्या घरातील कूलर, फ्रीझर आणि बेघरांसाठी आश्रय देणाऱ्या सिलिंग व्हेंटमध्ये लपविला होता. यानंतर त्याने एक करवत आणि ब्लेड विकत घेतले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ट्रक भाड्याने घेतला. जर मृतदेह सापडला नाही तर वाचेल असं त्याला वाटलं होतं.
अॅडमला कोर्टाने 30 वर्षाचा तुरुंगवास ठोठावला आहे. 2022 मध्ये आपल्या मुलीची हत्या, मृतदेहाचा छळ, प्राणघातक हल्ला आणि साक्षीदारांशी छेडछाड केल्याप्रकरणी दोषी नसल्याचं म्हटलं होतं. स्वत:च्या बचावासाठी पत्नी खोटे बोलत असल्याचा आरोपही त्याने केला. शपथेखाली खोटं बोलल्याबद्दल कोर्टाने पत्नीला 18 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.