पोटात होऊ लागल्या असह्य वेदना, Xray काढल्यानंतर जे दिसलं ते पाहून डॉक्टरही चक्रावले; पोटात तब्बल 1 फूट लांब....

Viral News: 52 वर्षाच्या व्यक्तीला पोटात असह्य वेदना होत होत्या. रुग्णालयात गेला असता डॉक्टरांनी एक्स-रे (X Ray) काढला. यानंतर जे दिसलं ते पाहून डॉक्टरांना आश्चर्याचा धक्काच बसला. डॉक्टरांनी विचारही केला नव्हता अशी गोष्ट त्याच्या पोटातून बाहेर काढण्यात आली आहे. सोशल मीडियावर (Social Media) याचे फोटो व्हायरल (Viral) झाले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Jun 14, 2023, 08:46 AM IST
पोटात होऊ लागल्या असह्य वेदना, Xray काढल्यानंतर जे दिसलं ते पाहून डॉक्टरही चक्रावले; पोटात तब्बल 1 फूट लांब.... title=

Viral News: 52 वर्षीय एका व्यक्तीच्या पोटात असह्य वेदना होऊ लागल्या होत्या. यानंतर त्याने थेट रुग्णालय गाठत डॉक्टरांची भेट घेतली. इतक्या वेदना होत असल्याने डॉक्टरांनीही एक्स-रे (X Ray) काढण्यास सांगितलं. पण एक्स-रे काढल्यानंतर रिपोर्ट हाती आला तेव्हा डॉक्टरांना आश्चर्याचा धक्काच बसला. आपण जे पाहत आहोत त्यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. ही गोष्ट पोटात कशी पोहोचली हेच त्यांना समजत नव्हतं. पण अखेर डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला आणि ती गोष्ट बाहेर काढली. सोशल मीडियावर याचे फोटो व्हायरल (Viral) झाले आहेत. 

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, ही घटना मध्य अमेरिकेच्या ग्वाटेमाला येथे घडली आहे. येथे रुझवेल्ट रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सर्जरी करत एका व्यक्तीच्या पोटातून 1 फूट लांब काठी बाहेर काढली आहे. विशेष म्हणजे, ही काठी सरळ नाही तर वाकडी होती. यामुळे त्या व्यक्तीच्या पोटात असह्य वेदना होत होत्या. जेव्हा तो रुग्णालयात पोहोचला तेव्हा डॉक्टरांनाही एक्स-रे पाहून विश्वास बसत नव्हता. 

डॉक्टरांना काठी पोटात कशी गेली हा प्रश्न सतावत होता. यावर त्या व्यक्तीने धक्कादायक माहिती दिली. त्याने सांगितलं की, माझ्या डोक्यात चित्र विचित्र आवाज ऐकू येत होते. त्यांनीच मला काठी गिळण्यास सांगितलं होतं. यानंतर मला प्रचंड वेदना होऊ लागल्या. या व्यक्तीच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नाही. 

डॉक्टरांना तपासणी केल्यानंतर संबंधित व्यक्तीला सिजोफ्रेनिया (Schizophrenia) असल्याचं लक्षात आलं. Schizophrenia हा एक गंभीर मानसिक आजार आहे. या आजारात संबंधित व्यक्तीचं विचार करणं, अनुभवणं आणि वागणं या गोष्टी प्रभावित झालेल्या असतात. आपण वास्तविक जगाशी आता जोडलेलो नाही असं त्यांना वाटत असतं. यामुळे भ्रमाची स्थिती निर्माण होते.

रुग्णालयाने एक्स-रे आणि ऑपरेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्याच्या पोटात काठी असल्याचं दिसत आहे. त्याच्या अन्ननलिकेमधेच ही काठी अडकली होती. डॉक्टरांनी सुरुवातीला तोंडाद्वारे ही काठी काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आलं नाही. यानंतर मग त्यांनी शस्त्रक्रिया करण्याचं ठरवलं. 

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ही काठी 1 फूट लांब आणि जवळपास 0.8 इंच रुंद होती. यामुळे रुग्णाच्या काही अवयावांना दुखापत झाली आहे. डॉक्टरांनी सर्जरी करताना त्याच्या पोटात एक छोटं छिद्र पाडलं आणि त्यातून काठी बाहेर काढली. या प्रक्रियेला गॅस्ट्रोटॉमी असं म्हणतात.