काश्मीर प्रश्नावर मध्यस्थीसाठी तयार - डोनाल्ड ट्रम्प

काश्मीर प्रश्नावर मध्यस्थीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तयारी दाखवली आहे.  

Updated: Sep 10, 2019, 10:50 AM IST
काश्मीर प्रश्नावर मध्यस्थीसाठी तयार - डोनाल्ड ट्रम्प title=

वॉशिंग्टन : काश्मीर प्रश्नावर मध्यस्थीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तयारी दाखवली आहे. भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव निवळला आहे, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, 'काश्मीर प्रश्नावर मध्यस्थीसाठी तयार आहे' दरम्यान, तिसऱ्या देशाची मध्यस्थी नको, अशी भारताची प्रथमपासून भूमिका आहे. त्यामुळे या प्रश्नात अमेरिकेने लक्ष घातल्याने चर्चा सुरु झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी पुन्हा एकदा काश्मीरवर मध्यस्थी करण्याच्या आपल्या ऑफरची पुनरावृत्ती करताना सांगितले.

जम्मू-काश्मीरच्या आधीच्या राज्याला विशेष दर्जा मिळालेला आणि जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्र शासित प्रदेशात विभाजन केल्यामुळे कलम 37० रद्द केल्याने भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. काश्मीरबाबत भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष आहे, हे तुम्हाला माहिती आहेच. दोन आठवड्यांपूर्वीच्या तुलनेत सध्या ते थोडेसे कमी झाले आहे, असे मला वाटते, ट्रम म्हणालेत. अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिना येथील फेएटविले येथे प्रचार मोर्चासाठी निघण्यापूर्वी अध्यक्ष ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांना याबाबत सांगितले.

 भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणाव कमी होतोय. दोन्ही देशांना गरज वाटल्यास मध्यस्थीसाठी तयार असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलंय. जुलै महिन्यात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेचा दौरा केला होता. त्यावेळीही ट्रम्प यांनी काश्मीरच्या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये मध्यस्थीचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु हा द्विपक्षीय मुद्दा असल्याचं सांगत भारतानं त्यांचा प्रस्ताव फेटाळला होता. तसंच जी ७ परिषदेदरम्यानही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि पाकिस्तानदरम्यानचे सर्व मुद्दे हे द्विपक्षीय असल्याचं सांगत यामध्ये तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप आवश्यक नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानदरम्यान हस्तक्षेपाचा मुद्दा पुढे केला आहे. 

तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रांच्या सभेला उपस्थित रहाणार आहेत. दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पंतप्रधान या सभेमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे या सभेकडे सगळ्यांच्याच नजरा आहेत. संयुक्त राष्ट्र सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करणार आहेत, त्याच दिवशी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही या सभेत भाषण करणार आहेत. त्यामुळे, संयुक्त राष्ट्र सभेत भारत आणि पाकिस्तान एकमेकांविषयी काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.