चीनच्या मासळी आणि मांस बाजारात आढळला कोरोना व्हायरस

लोकांना मासे न खाण्याचे आवाहन

Updated: Jun 19, 2020, 05:22 PM IST
चीनच्या मासळी आणि मांस बाजारात आढळला कोरोना व्हायरस

बिजिंग :  चीनमध्ये सध्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर बिजिंगच्या होलसेल मासळी मार्केटमध्ये मांस आणि समुद्री मासे खाणाऱ्या वर्गाला कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे. या भागातले कमी तापमान आणि अधिक आद्रता हे त्याचे कारण सांगितले जात आहे.

गेल्या आठवड्यात चीनमध्ये कोविड १९ चे रुग्ण पुन्हा आढळू लागले, ते फूडसेंटरशी संबंधित आहेत. त्यानंतर हा प्राथमिक अहवाल आला आहे. वेअर हाऊस आणि ट्रेडिंग सेंटर असलेले हे फूड सेंटर इतकं मोठं आहे की त्याचा आकार १६० फुटबॉल मैदानांएवढा आहे.

या भागातून अलिकडेच १०० हून अधिक लोक कोरोनाबाधित असल्याचे आढळले. त्यामुळे इथून पूर्ण चीनमध्ये कोरोना संक्रमण फैलावण्याची भीती आणखी वाढली आहे.

या बाजारात काम करणारे कोरोनाचे रुग्ण आढळले त्यात अधिक रुग्ण हे समुद्री मासळी भोजन आणि उत्पादन स्टॉलवर काम करणारे आहेत. याशिवाय बीफ आणि मांस विक्री करणारेही आहेत.

कमी तापमान आणि अधिक आर्द्रता कोरोना व्हायरसला जिवंत ठेवण्यास अनुकूल असतात असं तज्ज्ञाचं मत आहे. त्यावरूनच सीफूड मार्केट कोरोना व्हायरसच्या प्रकोपाचा स्त्रोत असू शकतो असा निष्कर्ष काढला जात आहे.

खरं तर हा व्हायरस नेमका आला कुठून हे अजून निश्चित झालेलं नाही. तरीही बिजिंगच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी कच्चे मासे न खाण्याचं आवाहन केलं आहे. कारण व्हायरस मासे कापण्याच्या जागेवर आढळून आला होता.

 

या आठवड्यात सत्तारुढ कम्युनिस्ट पार्टीच्या एका प्रमुख नेत्याने सांगितले होते की, घाऊक खाद्य बाजारांमध्ये स्वच्छतेच्या उपाययोजना आणि तिथून होणाऱ्या खाद्य वितरण व्यवस्थेतील त्रुटी तात्काळ लक्ष देऊन दूर करण्याची गरज आहे.