महागाईनं कंबरडं मोडलं : करोडो रुपये हातात, पण एकावेळचं जेवण महाग!

गेल्या काही दिवसांत व्हेनेझुएलाच्या तब्बल १० लाख लोकांनी या देशात आसरा घेतलाय

महागाईनं कंबरडं मोडलं : करोडो रुपये हातात, पण एकावेळचं जेवण महाग!

साओ पाउलो : 'आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना' अशी अवस्था व्हेनेझुएलाच्या नागरिकांची झालीय. महागाई म्हणजे काय? हे जाणून घ्यायचं असेल तर दक्षिण अमेरिकी देश व्हेनेझुएलाची सद्य परिस्थिती जाणून घ्यावीच लागेल. या देशाच्या चलनाची अवस्था इतकी वाईट झालीय की इथला करोडपती व्यक्तीलाही दोन वेळच्या जेवणाची भ्रांत सतावतेय... मग बेरोजगार आणि गरिबांची परिस्थिती काय असेल, याच्या विचारानंच अंगावर काटा उभा राहील. 

इथल्या नोटांची किंमत शून्यावर आलीय. एक किलो भाजी खरेदी करण्यासाठीही लाखो रुपये द्यावे लागत आहेत. या देशाची आर्थिक परिस्थिती इतकी ढासळलीय की इथले लोक व्हेनेझुएला सोडून शेजारी देश कोलंबियात जाण्यासाठी आतूर झालेत. 

एका ब्रेडसाठी या देशात हजारो रुपये मोजावे लागत आहेत. एक किलो मांसासाटी ३ लाख रुपये तर एक लीटर दुधासाठी ८० हजार रुपये खर्च करावे लागत आहेत. ही परिस्थिती स्थानिक सरकारच्या हाताबाहेर गेलीय. आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारनं जगासमोर हात पसरलेत. 

सामानाची सद्य किंमत

एक कप कॉफी  : २५ लाख

एक किलो मांस : ९५ लाख

एक किलो बटाटे : २० लाख

एक किलो गाजर : ३० लाख

एक किलो तांदूळ : २५ लाख

एक किलो पनीर : ७५ लाख

एक किलो टोमॅटो : ५० लाख

एक प्लेट नॉनव्हेज थाळी : १ करोड 

कोलंबियानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत व्हेनेझुएलाच्या तब्बल १० लाख लोकांनी या देशात आसरा घेतलाय. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाल्यानं व्हेनेझुएला आर्थिक संकटात सापडलंय. इथल्या सरकारनं गरजेपेक्षा जास्त नाण्यांची छपाई केली... त्यामुळे त्याचं मूल्य कोसळलंय. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सामान्यांवर भुकबळीला सामोरं जावं लागतंय.