Israel-Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती काही केल्या सुधारण्याचं नाव घेताना दिसत नसल्यामुळं आता संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. हजारो निष्पापांचा या युद्धात बळी गेल्यामुळं आता ही परिस्थिती आणखी बिघडू नये याचसाठी अनेक बडी नेतेमंडळी प्रयत्न करताना दिसत आहेत. तिथं इस्रायलमध्ये परिस्थितीनं धोक्याची सीमाही ओलांडलेली असतानाच आता जागतिक स्तरावरील एक महत्त्वाची व्यक्ती या युद्धभूमीत पोहोचणार आहे.
US कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) बुधवारी धोका पत्करत इस्रायल गाठणार आहेत. इथं ते इस्रायलचे पंतप्रधान बेन्यामिन नेतन्याहू यांची भेट घेत इस्रायलच्या संघर्षात स्वत:चा बचाव करण्याच्या भूमिकेला पाठिंबा देताना दिसणार आहेत. अमेरिकेच्या सचिवपदी असणाऱ्या अँटनी ब्लिंकन यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
इस्रायलमधील निरपराध नागरिकांसह अमेरिकी नागरिकांवर झालेला आघात पाहता इस्रायलला आत्मसंरक्षणासाठी पावसं उचलण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं बायडेन पुन्हा स्पष्ट करणार आहे. शिवाय युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेत इस्रायलवर हल्ले चढवण्याचा प्रयत्नही करु नका असा इशाराही ते करणार असल्याचं सचिवांनी सांगितलं.
इस्रायली अधिकारी आणि यंत्रणांशी संपर्क ठेवत हमालनं ओलीस ठेवलेल्यांची सुटका करण्यासाठीही राष्ट्राध्यक्ष बायडेन प्रयत्न करतील . गाझातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी बायडेन आणि इस्रायलकडून मानवसेवा संस्था, मित्रराष्ट्र आणि काही समाजसेवी संस्थांसोबत मिळून बेतही आखला जात असल्याची माहिती सचिव ब्लिंकन यांनी दिली.
#WATCH | Israel: US Secretary of State, Antony Blinken says "US President Joe Biden will visit Israel on Wednesday. He is coming here at a critical moment for Israel, for the region, and for the world. President Biden will reaffirm the United States' solidarity with Israel.… pic.twitter.com/fdWaEhma3K
— ANI (@ANI) October 17, 2023
इस्रायली लष्कराच्या माहितीनुसार (Lebanon) लेबनन सीमेवर हेज्बोल्लाच्या दहशतवाद्यांनी आयडीएफ टँक आणि तळांवर हल्ले केले. त्यांनी सातत्यानं रॉकेट हल्लेसुद्धा केले. ज्यानंतर राजधानी तेल अवीवसह नजीकच्या भागात सायरन वाजू लागले. ही परिस्थिती पाहता इस्रायलच्या लष्करानं तोफा लेबननच्या दिशेनं वळवल्या आणि ठिकठिकाणी बॉम्ब आणि तोफगोळ्यांचा मारा सुरु केला. ज्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीसुद्धा नेतन्याहू यांच्याशी संवाद साधत प्रकरण शमवण्याच्या विचारावर जोर दिल्याचं पाहायला मिळालं.