Pak Terrorist Habibullah killed : गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानात भारताविरोधी कारवाया करणाऱ्या अनेक दहशतवाद्यांची अज्ञातांनी हत्या केली आहे. दुसरीकडे आता 93 च्या साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला (Dawood Ibrahim) कराचीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त समोर आलं आहे. दाऊदवर विषप्रयोग झाल्याची माहिती समोर येत असतानाच पाकिस्तानमध्ये आणखी एक मोठा दहशतवादी मारला गेला आहे. लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी हबीबुल्ला याची पाकिस्तानात एका अज्ञात बंदूकधाऱ्याने हत्या केली आहे. दहशतवादी हबीबुल्लाला कोणी गोळ्या घालून ठार मारले, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. दहशतवादी हबीबुल्ला हा लष्कर प्रमुख हाफिज सईदच्या अत्यंत जवळचा होता. त्यामुळे हबीबुल्लाची हत्या हा सईदसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा जवळचा सहकारी हबीबुल्लाह याची रविवारी संध्याकाळी अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हबीबुल्लावर गोळीबार केला, ज्यात तो ठार झाला. भारतातील उरी येथील दहशतवादी हल्ल्यातही हबीबुल्लाचा हात होता. हा हल्ला 2016 मध्ये झाला होता, त्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईकही केला होता.
पख्तुनख्वा प्रांतात दहशतवादी हबीबुल्लाला एका बंदुकधारी व्यक्तीने लक्ष्य करून गोळ्या घालून ठार केल्याचे म्हटलं जात आहे. लश्करचा दहशतवादी हबीबुल्ला पाकिस्तानातील लोकांना दहशतवादी बनण्यासाठी प्रवृत्त करत असे आणि तोच त्यांना लष्करात भरती करत असे. माध्यमांच्या वृत्तानुसार, पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञात बंदूकधाऱ्यांनी आतापर्यंत सुमारे 23 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानमध्ये अशा प्रकारे अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. या दहशतवाद्यांमध्ये बिलाल मुर्शिद, अक्रम गाझी, अबू कासिम यांसारख्या अनेक दहशतवाद्यांचा समावेश आहे. दुसरीकडे मुंबई साखळी बॉम्बस्फोटात सहभागी असलेला दाऊद इब्राहिमही रुग्णालयात दाखल आहे. त्याच्यावर अज्ञात व्यक्तीने विष प्रयोग केल्याचे वृत्त असून त्याला उपचारासाठी पाकिस्तानातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या सगळ्या कारवायांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी प्रतिक्रिया दिली होती. 'जे भारताला हवे आहेत, त्यांना न्याय प्रक्रियेअंतर्गत येथे शिक्षा द्यायची आहे. या लोकांनी भारतातच प्रत्यार्पण करावे, असे आमचे मत आहे,' असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं होतं.