निवडणूक निकालानंतर नरेंद्र मोदींचं अभिनंदन का केलं नाही? पाकिस्तानने केला खुलासा, 'भारतीयच...'

पाकिस्तानने नरेंद्र मोदींचं निवडणूक विजयाबद्दल अभिनंदन केलं नाही यामागील कारणाचा उलगडा केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 8, 2024, 03:20 PM IST
निवडणूक निकालानंतर नरेंद्र मोदींचं अभिनंदन का केलं नाही? पाकिस्तानने केला खुलासा, 'भारतीयच...' title=

लोकसभा निवडणुकीत एनडीए बहुमताने पुन्हा एकदा सत्तेवर आलं असलं तरी, अपेक्षित यश मिळालेलं नाही. दरम्यान रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी रविवारी पार पडणार आहे. पण नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार असतानाही पाकिस्तानने अद्याप अभिनंदन केलेलं नाही. दरम्यान पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आताच अभिनंदन कऱणं हे अकाली असल्याचं म्हटलं आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अधिकृतपणे अभिनंदन केलं आहे की नाही अशी विचारणा कऱण्यात आली असता त्यांनी हे उत्तर दिलं. 

"त्यांच्या निवडणूक प्रक्रियेवर आम्हाला कोणतंही भाष्य करायचं नाही," असं बलोच यांनी सांगितलं. भारतात सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू असल्याने, भारतीय पंतप्रधानांचे अभिनंदन करण्याबद्दल बोलणं अकाली आहे असंही त्यांनी सांगितलं. 

बलोच यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित करताना सांगितलं की, "पाकिस्तानला भारतासह सर्व शेजारी राष्ट्रांशी सहकार्याचे संबंध ठेवण्याचे आणि  चर्चेच्या माध्यमातून वाद मिटवण्याची इच्छा आहे. भारताकडून येणाऱ्या अडचणी न जुमानता पाकिस्तान जबाबदारीने वागत आहे".

"पाकिस्तानला नेहमीच भारतासह सर्व शेजारी देशांसोबत सहकार्याचे संबंध हवे आहेत. जम्मू आणि काश्मीरच्या मूळ वादासह सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही सातत्याने रचनात्मक संवाद आणि सहकार्याला प्राधान्य दिलं आहे," असं बलोच यांनी सांगितलं. 

भारताने जम्मू काश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर पाकिस्तानसोबतचे संबंध तणावपूर्ण आहेत. 5 ऑगस्ट 2019 ला केंद्र सरकराने जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 हटवलं होतं. पाकिस्तानशी सामान्य शेजारी संबंध हवे आहेत, असं भारताचं म्हणणं आहे, पण दहशतवाद आणि शत्रुत्वमुक्त वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी इस्लामाबादवर आहे असंही भारताने स्पष्ट केलं आहे. 

"पाकिस्तान शांततापूर्ण सह-अस्तित्वावर विश्वास ठेवतो. आम्हाला आशा आहे की भारत शांतता आणि संवादाच्या प्रगतीसाठी आणि पाकिस्तान आणि भारताच्या लोकांच्या परस्पर फायद्यासाठी दीर्घकालीन विवादांचे निराकरण करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी पावले उचलेल," असं बलोच म्हणाल्या. 

दरम्यान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी सज्ज झाले आहे. लोकसभा निवडणुकीत एनडीएला 293 जागा मिळाल्या आहेत.