न्यूयॉर्क : संपूर्ण जगात कोरोना व्हायरसमुळे एकच खळबळ माजली आहे. एवढचं नाही तर कोरोनामुळे बहुतांश नागरिकांची झोप उडाली आहे. काहींची झोप कोरोनाच्या चिंतेमुळे उडाली आहे तर काहींची लॉकडाऊनमधील दिनचर्येमुळे. यामागचं नक्की कारण काय असावं यावर आता वैज्ञानिक संशोधन करणार आहेत. न्यूरोवैज्ञनिकांचा एक आंतरराष्ट्रीय गट या विषयावर संशोधन करणार आहेत.
झोप शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण मानली जाते. ऊतकांची दुरुस्ती, पेशींची निर्मिती, रोगप्रतिकार कार्ये, स्मरणशक्ती आणि मनःस्थिती आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शरीरास झोप अत्यंत महत्त्वाची आहे. लॉकडाऊन काळात अनेक नागरिकांनी झोपे विषयी प्रश्न उपस्थित केले आहेत.
या आणीबाणीच्या काळात निर्माण झालेल्या अडचणी त्यामुळे झोपेची समस्या शिवाय झोपेत वेगळे स्वप्न पडणे, वाढणारं नैराश्य, सतत होणारी चिडचिड अशा अनेक गोष्टींवर वैज्ञानिक संशोधन करणार आहेत. ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या नेतृत्वाखाली नागरिकांचे आरोग्य आणि झोप या विषयाावर संशोधन केले जाणार आहे.
इंटरनॅशनल COVID-19 स्लीप स्टडी (ICOSS)मध्ये ऑस्ट्रिया, कॅनडा, चीन, फिनलॅंड, फ्रान्स, जर्मनी, हाँगकाँग, जपान, नॉर्वे आणि अमेरिका हे देश सहभाग घेणार आहेत. ऑक्सफोर्डचे प्रोफेसर कॉलिन एस्पी म्हणतात की, 'चांगली झोप मिळाल्यानंतर आपण कोणत्याही गोष्टीचा सहज सामना करू शकतो. त्यामुळे या महामारीच्या काळात झोपेबाबत निर्माण झालेले प्रश्न अत्यंत चिंताजनक आहे.' याविषयावर आमची टीम सखोल अभ्यास करणार असल्याचं देखील ते म्हणाले.