Smiling Sun : पृथ्वीवरुन सूर्य हा आपल्याला आगीचा गोळा वाटतो. त्यामुळे त्याच्या जवळ जो जाईल तो राख होईल असे म्हटलं जाते. पण या पृथ्वीवर जीवसृष्टीचे सर्वात मोठे कारण सूर्य आहे, यामध्ये दुमत नाही. सूर्य नसता तर हे जगच नसते. आपण जवळजवळ दररोज सकाळी आणि संध्याकाळी सूर्याकडे पाहतो तेव्हा त्याची वेगवेगळी रूपे आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. पण सूर्याला कधी हसताना पाहिलंय का? कदाचित पाहिले नसेल. पण नासाच्या उपग्रहाने पहिल्यांदा कॅमेऱ्यात सूर्याचा हसताना फोटो टिपला आहे. (sun is smiling NASA satellite took amazing picture of Sun)
नासाने सूर्याचा असा अनोखा फोटो काढला आहे, ज्यामध्ये सूर्य हसताना स्पष्ट दिसत आहे. सूर्याचा हा फोटो तुम्ही एखाद्या कार्टुनमध्ये नक्कीच पाहिला असेल. पण, सूर्याच्या या हसण्यावर जाऊ नका, तर त्याचे उग्र रूप पाहून पृथ्वीवर सावध व्हा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सूर्य का हसत आहे?
यूएस नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) ने ट्विटरवर सूर्याचा असा फोटो शेअर केला आहे, जो अत्यंत आश्चर्यकारक आणि दुर्मिळ आहे. कारण, या फोटोमध्ये सूर्य हसताना स्पष्ट दिसत आहे. नासाने म्हटले आहे की त्यांच्या सोलर डायनॅमिक्स वेधशाळेने आपल्या कॅमेऱ्यातून सूर्याचा फोटो काढला आहे. अतिनील किरणांमध्ये दिसणारे सूर्यावरील हे गडद ठिपके कोरोनल छिद्र (coronal holes) म्हणून ओळखले जातात. येथून तीव्र सौर वारे अंतराळाच्या दिशेने वाहतात आणि पृथ्वीसह इतर ग्रहांपर्यंत पोहोचू शकतात.
Say cheese!
Today, NASA’s Solar Dynamics Observatory caught the Sun "smiling." Seen in ultraviolet light, these dark patches on the Sun are known as coronal holes and are regions where fast solar wind gushes out into space. pic.twitter.com/hVRXaN7Z31
— NASA Sun, Space & Scream (@NASASun) October 26, 2022
सूर्याच्या हास्यात (Smiling Sun) दडलय भयानक सत्य!
पण, अंतराळ तज्ज्ञांच्या मते, सूर्याचा हा फोटो डोळ्यांना वाटतो तितका आनंददायी नाही. नासाने असेही सांगितले आहे की अल्ट्राव्हायोलेट किरणांमध्ये (ultraviolet waves) दिसणारे काळे ठिपके हे खरे तर कोरोनल होल असतात, जेथून सौर वादळातून निघणारे जोरदार सौर वारे अवकाशातून पृथ्वीसह इतर ग्रहांपर्यंत पोहोचू शकतात. खरं तर, सूर्याचा चेहऱ्यासारखा जो आकार तयार होत आहे तो कोरोनल छिद्रांचा (coronal holes) परिणाम आहे, जे मुळात सूर्याच्या वातावरणातील खुले चुंबकीय क्षेत्र आहे.
सौर वादळे ही सूर्याच्या पृष्ठभागावरील चुंबकीय ऊर्जेतून उत्सर्जित होणाऱ्या किरणोत्सर्गाचे अतिशय शक्तिशाली आणि तीव्र स्फोट असतात. 2022 मध्ये पृथ्वीच्या वातावरणाला आतापर्यंत अनेक शक्तिशाली सौर वादळांचा सामना करावा लागला आहे, ज्यामुळे एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचे अनेक उपग्रहही जळून खाक झाले आहेत. Spaceweather.com या वेबसाईटवर सूर्यावर होणाऱ्या छोट्या मोठ्या घटनांची माहिती गोळा करुन ठेवली जाते. त्यांच्या मते, सूर्याच्या या स्मित हास्यामुळे 28 आणि 29 ऑक्टोबरला एक अतिशय तीव्र सौर वादळ पृथ्वीवर धडकू शकते.
अंतराळवीरांनाही सौर वादळाचा धोका
दरम्यान, सौर वादळांमुळे पृथ्वीवरील मानवाला थेट हानी पोहोचत नाही, तसेच आरोग्यालाही हानी पोहोचल्याची नोंद नाही. मात्र यामुळे रेडिओ, कम्युनिकेशन, जीपीएस यासह विद्युत यंत्रणेचे गंभीर नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच, अंतराळ मोहिमेवरील शास्त्रज्ञ किंवा अंतराळात काम करणार्या अंतराळवीरांना सूर्याच्या शक्तिशाली चुंबकीय उर्जेच्या किरणोत्सर्गामुळे हानी पोहचण्याचा धोका असू शकतो.