अरे! चालत्या बाईकवर असं कोणी करतं का?

व्हिडिओ व्हायरल...

Updated: Jan 27, 2020, 03:14 PM IST
अरे! चालत्या बाईकवर असं कोणी करतं का?

नवी दिल्ली : सध्या सर्वांचच जीवन धावपळीचं झालं आहे. प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई आहे. पण आता २ पुरुष इतके घाईत आहेत की, त्यांच्या या घाईची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. व्हिएतनाममधील दोघांचा बाईक चालविताना चक्क अंघोळ करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. 

दक्षिण व्हिएतनाममधील Dau Tieng जिल्ह्यात ही घटना घडली आहे. बाईक चालवताना दोन पुरुष अंघोळ करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. २३ वर्षीय Huynh thanh khanh आणि आणखी एक पुरुष बाईकवर शर्ट, हेल्मेट न घालता दिसतात.

एक जण बाईक चालवतोय. तर दुसरा पुढ्यात पाण्याने भरलेली बादली घेऊन त्याला स्वत:ला आणि बाईक चालवणाऱ्याला अंघोळ घालतोय. दोघेही साबण लावतायेत, बादलीतून पाणी घेत अंघोळ करताना दिसतात. अगदी वर्दळीच्या, भररस्त्यात दोघेही अशाप्रकारे अंघोळ करतात.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय. व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांनी त्यांच्या बाईकच्या नंबर प्लेटवरुन या दोघांचा शोध घेतला. 

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत असला तरी अनेक लोकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येतेय. हे दोघेही अशाप्रकारे स्टंट करुन त्यांच्यासोबतच इतर वाटसरुंचंही आयुष्य धोक्यात घालत असल्याचं बोलण्यात येत आहे. 

'Tuoi Tre'वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, या दोघांना वाहतूकीच्या विविध नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय चलनानुसार साडे पाच हजारांचा दंड ठोठावला आला आहे. त्यामुळे तुम्हीही अशा काहीतरी विचित्र करण्याच्या किंवा नियमांचं उल्लंघन करत स्टंट करण्याचा विचार करत असाल तर... सावधान.