Coronavirus : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या होणाऱ्या पत्नीमध्ये कोरोनाची लक्षणं

पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पत्राच्या माध्यमातून जनतेला केलं आवाहन.   

Updated: Apr 7, 2020, 11:14 AM IST
Coronavirus : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या होणाऱ्या पत्नीमध्ये कोरोनाची लक्षणं title=

मुंबई : गेल्या आठवड्यात ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची कोरोना व्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आली. पण सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. म्हणून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. शिवाय पंतप्रधान बोरिस जॉन्सनयांच्या होणाऱ्या पत्नीमध्ये देखील कोरोनाची लक्षणं असल्याचं सांगण्यात येत आहे. अद्याप सायमंड्स यांची कोरोना चाचणी करण्यात आलेली नाही. गेल्या एक आठवड्यापासून त्या आराम करत आहेत. 

 पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या तब्येतीमुळे त्यांच्या पदाची संपूर्ण जबाबदारी परराष्ट्रमंत्री डोमनिक रॉब यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.  पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण झाल्याचं कळताच त्यांनी स्वत:ला आयसोलेशनमध्ये ठेवले. परंतु ५ एप्रिल रोजी संध्याकाळी त्यांना लंडनच्या सेंट थॉमस रुग्णालयात दाखल करण्यात आले.  त्यानंतर प्रकृतीत सुधारणा नसल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

डाऊनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार, 'सोमवारी दुपारी त्यांची प्रकृती अचानक खराब झाली. त्यामुळे त्यांच्या मेडिकल टीमच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ' सोमवारी सकाळी त्यांची प्रकृती स्थिर होती, पण संध्याकाळी अचानक खालावली. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी ते संपूर्ण कामकाज हाताळत होते. 

पत्राच्या माध्यमातून जनतेला केलं आवाहन 
कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर त्यांनी देशातील ३ कोटी कुटुंबीयांना पत्राच्या माध्यमातून आवाहन केले आहे, 'आप-आपल्या घरात सुरक्षित राहा. नाहीतर परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे.' असं  पत्र त्यांनी देशाच्या नागरिकांना लिहिलं आहे.