मुंबई : हेनले पासपोर्ट इंडेक्स नं ग्लोबल मोबिलिटी रिपोर्ट 2021 (Global Mobility Report 2021) प्रसिद्ध केला आहे. यामध्ये अग्रस्थानी जपान आणि सिंगापूर या दोन देशांच्या पासपोर्टचा समावेश आहे. या यादीमध्ये भारत 90 व्या स्थानावर आहे. मागील वर्षापासून भारताची जागा सहा स्थानं खाली आली आहे.
हेनले पासपोर्टच्या यादीत जर्मनी आणि दक्षिण कोरिया दुसऱ्या स्थानावर आहेत. फिनलँड, इटली, स्पेन आणि लक्झमबर्ग तिसऱ्या स्थानावर आहेत. तर डेन्मार्क चौथ्या स्थानावर आहे. फ्रान्स, आयर्लंड, नेदरलँड, पोर्तुगाल आणि स्वीडन ही राष्ट्र पाचव्या स्थानावर आहेत. क्रमवारीनुसार प्रत्येक राष्ट्राच्या पासपोर्टला अनन्यसाधारण महत्त्वं आहे.
मागील वर्षी भारत या यादीत 84 व्या स्थानावर होता. भारताच्या शेजारी राष्ट्रांचीही स्थिती अशीच आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये भूटान 96 व्या स्थानावर, म्यानमार 102 व्या स्थानावर, श्रीलंका 107 व्या स्थानावर, नेपाळ 110 व्या स्थानावर पाकिस्तान 113 व्या स्थानावर आणि अफगाणिस्तान 116 व्या स्थानावर आहे.
काय आहे आयटीएची भूमिका?
हेनले पासपोर्ट इंडेक्स अशा वेळी प्रसिद्ध करण्यात आली आहे ज्यावेळी अनेक देशांमध्ये कोरोनानं थैमान घातलं असून, काही राष्ट्रांनी आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रवासाला परवानगी दिली आहे. या यादीतील निर्णय ट्रांसपोर्ट असोसिएशनकडून देण्यात आलेल्या आकडेवारीवर आधारित आहे.
पासपोर्टच्या बाबतीत सर्वाधिक शक्तिशाली देश
पासपोर्टच्या बाबतीत जापान, सिंगापुर, जर्मनी, साउथ कोरिया, फिनलँड, इटली, लक्जमबर्ग, स्पेन, फ्रांस आणि आयरलँड या राष्ट्रांचा समावेश आहे. तर या यादीत सर्वात कमी रँकिंग असणाऱ्या देशांमध्ये अफगानिस्तान, इराक, सीरिया, पाकिस्तान, यमन, सोमालिया, फिलिस्तीन, नेपाल, नॉर्थ कोरिया आणि लिबीया या राष्ट्रांचा समावेश आहे.