दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई : राज्यात शिक्षक भरतीसारखा महत्त्वाचा विषय आजही प्रलंबित आहे. लाखो तरुण तरुणी उच्च शिक्षित असूनही बरोजगार आहेत. हा विषय झी २४ तासनं सातत्यानं लावून धरला आणि शिक्षण विभाग कामाला लागलंय.
राज्यात २००८ नंतर शिक्षक भरती झाली नसून तब्बल दहा वर्षांनी भरतीची प्रक्रिया होणार आहे. शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता चाचणी देऊन वर्ष उलटलं तरीही अजून भरती झाली नसल्यानं, राज्यातला तरुण वर्ग प्रचंड नाराज आहे. येत्या जानेवारीत शिक्षक भरती होणार असून रिक्त जागांबाबतची आकडेवारी आणि आरक्षणाची पदं मागवण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचं, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलंय.
दरम्यान, शिक्षक भरतीबाबत यापूर्वीही घोषणांचा पाऊस पडल्यानं, सरकारवर विश्वास नसल्याची प्रतिक्रिया, शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या डीएड बीएड धारकांनी दिलीय.
शिक्षक भरतीमधल्या ७० टक्के जागा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असून, उर्वरित जागा खासगी अनुदानित शाळांच्या आहेत. माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीत शिक्षक पदाच्या किती जागा रिक्त आहेत पाहूयात,
- पहिली ते नववीसाठी २४ हजार शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत
- नववी ते बारावीसाठी शिक्षकांसाठीच्या ११ हजार ५८९ जागा रिक्त आहेत
- यासाठी तब्बल १ लाख ७८ हजार डीएड बीएड धारकांनी अभियोग्यता चाचणी डिसेंबर २०१७ मध्ये दिली
खासगी अनुदानित शिक्षण संस्थेतली शिक्षक भरतीचा तिढा कायम असून न्यायालयाच्या आदेशानुसार खासगी शाळांची शिक्षक भरती त्यांनी घेतलेल्या मुलाखतीनुसार होणार असून त्यासाठी उमेदवार मात्र शिक्षण विभागाकडून देण्यात येणार आहेत. मात्र किती उमेदवार मुलाखतींसाठी द्यायचे हे अद्याप निश्चित नसून त्यावर चर्चा सुरु आहे.
खुप खुप आभार @zee24taasnews आपण #शिक्षकभरती चा पाठपुरावा केल्याबद्दल. शिक्षक भरतीची वाट पहाणार्यामंध्ये ९०% गरीब शेतकऱ्यांची मुले आहेत. आपण याची दखल घेतली. @TawdeVinod @CMOMaharashtra @jdipali @vinodpatilzee @vithobasawant @amitjoshitrek pic.twitter.com/61NKk8KMPJ
— Mahesh Dadewad (@MDadewad) December 14, 2018
दरम्यान, हा विषय 'झी २४ तास'ने सर्वप्रथम मांडल्याने ट्विटरद्वारे तरुणांनी 'झी २४ तास'वर अभिनंदनाचा वर्षाव केला. निवडणुकीआधी शिक्षक भरतीची घोषणा झाली असली तरी आचार संहिता सुरु होण्यापूर्वी म्हणजेच साधारण फेब्रुवारी महिना संपण्याच्या आत शिक्षक भरतीची प्रक्रिया शिक्षण विभागाला पूर्ण करावी लागणार आहे.