बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'डर' चित्रपटाचाही उल्लेख होतो. शाहरुख खानला बॉलिवूमध्ये ओळख निर्माण करुन देण्यात या चित्रपटाने मोलाचा वाटा उचलला आहे. यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात शाहरुख खानने एका तरुणीच्या प्रेमात कोणत्याही थराला जाणाऱ्या प्रियकराची भूमिका निभावली होती. शाहरुख खानने हे पात्र ज्याप्रकारे रंगवंल होतं, ते पाहता इतर कोणत्याही अभिनेत्याची तुम्ही कल्पना करु शकत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, सनी देओल (Sunny Deol) आणि जुही चावला (Juhi Chawla) यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या 'डर' (Dar) चित्रपटात शाहरुख खानने (Shahrukh Khan) साकारलेल्या भूमिकेसाठी आधी आमीर खानला (Aamir Khan) विचारणा करण्यात आली होती.
यश चोप्रा (Yash Chopra) यांनी आधी राहुल मेहराच्या भूमिकेसाठी आमीर खानल कास्ट करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांना यश मिळालं नाही. आमीर खानने त्यावेळी यश चोप्रा यांच्यासारख्या मोठ्या दिग्दर्शकासह काम करण्यास नकार का दिला होता? आमीर खाननेच एका मुलाखतीत याचं कारण सांगितलं होतं.
काही वर्षांपूर्वी आमीर खान कॅनडा टूरवर गेला होता. यावेळी सुषमा दत्तला दिलेल्या मुलाखतीत त्याने डर चित्रपटात काम न करण्याचं कारण सांगितलं होतं. आमीरने सांगितलं होतं की, त्याला चित्रपटाची कथा आवडली होती आणि त्याची यश चोप्रा यांच्यासह काम करण्याची इच्छाही होती. पण त्याची एक अट होती, जे यश चोप्रा पूर्ण करु शकले नाहीत.
आमीरने सांगितलं होतं की, "मला चित्रपटाची कथा फार आवडली होती आणि यश चोप्रा फार चांगले दिग्दर्शक आहेत. पण माझा एक नियम आहे, तुम्ही हवं तर याला पॉलिसी म्हणू शकता. जर मी अशा चित्रपटात काम करत असेन ज्यामध्ये एकापेक्षा जास्त हिरो असतील तर मी दिग्दर्शकाला एकत्रित नॅरेशन देण्यास सांगतो. दिग्दर्शकान दोन्ही अभिनेत्यांना एकत्र नॅरेशन देणं याला मी प्राधान्य देतो.".
पुढे त्याने सांगितलं की, "अंदाज अपना अपना चित्रपटाच्या वेळीही मला आणि सलमानला जॉइंट नॅरेशन देण्यात आलं होतं. यामुळे दोघेही आपल्या भूमिकांवर समाधानी आहेत हे स्पष्ट होतं. तसंच नंतर कोणतीही समस्या निर्माण होत नाही. मला अशाच प्रकारे काम करायला आवडतं. पण या चित्रपटावेळी हे शक्य नव्हतं. यशजी यांनी आपण एकत्रित नॅरेशन द्यावं असं वाटत नव्हतं. यामुळे मला प्रोजेक्टमधून बाहेर काढण्यात आलं".
डर चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा सनी देओल आणि शाहरुख खान यांच्यात याच मुद्द्यावरुन वाद झाला होता. व्हिलन असतानाही चित्रपटात शाहरुख खानला जास्त स्क्रीन टाईम देण्यात आल्याने सनी देओल नाराज झाला होता. एका मुलाखतीत त्याने आपण पुन्हा यश चोप्रा यांच्यासह काम करणार नाही अशी शपथच घेतली होती. शाहरुख आणि सनी देओल यांच्यातील कटुता 'गदर 2' चित्रपट रिलीज झाल्यानंतर मिटली होती. आपल्यात गैरसमज निर्माण झाला, तो व्हायला नको होता असं सनीने एका मुलाखतीत सांगितलं होतं.