मुंबई : अभिनेता रणबीर कपूर यानं 2006 मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. रणबीरचा पहिला चित्रपट फारसा गाजला नाही, पण त्या चित्रपटानं एक नवा चेहरा बॉलिवूडला दिला ही बाब नाकारता येणार नाही.
तुमच्या माहितीसाठी म्हणून, रणबीरनं 2006 पूर्वीच बॉलिवूडच्या या विश्वात पाय ठेवला होता. 2005 मध्ये त्यानं संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'ब्लॅक' या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं होतं. पण, त्याचा हा अनुभव फारसा चांगला नव्हता.
एका मुलाखतीमध्ये खुद्द रणबीरनंच याचा खुलासा करत आपल्या या अनुभवाची गोष्ट सांगितली. 'तो अनुभव म्हणजे छळ होता', असं म्हणत संजय लीला भन्साळींकडून आपल्याला मार मिळत होता, असंही त्यानं सांगितलं.
एका मुलाखतीदरम्यान रणबीरनं हा खुलासा केला आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. भन्साळी आपल्याला बरीच कामं देत असं, मी त्यांच्यापुढे गुडघ्यांवरच असायचो असं तो म्हणाला होता.
रणबीरला भन्साळी यांच्याकडून मारही मिळत होता. एका वळणावर तर, हे सर्वकाही इतकं वाढलं की, आपली छळवणूक होत असल्याची भावना त्याच्या मनात घर करु लागली. सर्व कामं सोडण्याची इच्छा नाईलाजानं त्याच्या मनात घर करु लागली होती.
कामाची सुरुवात केली नाही तोच 11- 12 व्या महिन्यात सर्वकाही सोडण्याच्या वळणावर तो पोहोचला होता. भावनिकरित्या रणबीर कोलमडला होता. कामाच्या पहिल्या दिवसांमध्येच असे अनुभव आल्यावर तुमच्याआमच्यासारखेही कोलमडतात. रणबीर आपल्याहून वेगळा नव्हता.
असं असलं तरीही भन्साळींकडून आपण खूप काही शिकल्याचं तो म्हणाला. 'ते एक उत्तम शिक्षक आहेत. त्यांनी मला अभिनयापासून भावना आणि इतरही बऱ्याच गोष्टी शिकवल्या', असं तो म्हणाला.
एक अभिनेता म्हणून रणबीर सुरुवातीपासूनच खूप काही शिकत मोठा झाला. राज कपूर यांचा नातू आणि ऋषी कपूर यांचा मुलगा असतानाही रणबीरच्या वाट्याला आलेल्या अडचणी कमी झाल्या नाहीत. तो प्रत्येक वेळी पडत राहिला आणि पुन्हा नव्यानं उभा राहून शिकत राहिला आणि एक मोठा अभिनेता म्हणून नावारुपास आला.