'त्या' कामगारांच्या मदतीला धावला 'भाईजान'; तुम्हालाही वाटेल त्याचा अभिमान

गरजू व्यक्तींच्या मदतीसाठीसुद्धा अनेक हात पुढे सरसावले

Updated: Apr 3, 2020, 12:40 PM IST
'त्या' कामगारांच्या मदतीला धावला 'भाईजान'; तुम्हालाही वाटेल त्याचा अभिमान  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : Coronavirusने जगभरात थैमान घातलेलं असतानाच आता सर्वच देशांकडून मोठ्या धीराने आणि निर्धाराने या विषाणूशी लढा देण्यात येत आहे. भारतातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लॉकडाऊनच्या निर्णयानंतर सर्वांनीच त्यांच्या या निर्णयाला पाठिंबा दिला. ज्यामागोमाग परिस्थितीत देशातील आणि समाजातील काही गरजू व्यक्तींच्या मदतीसाठीसुद्धा अनेक हात पुढे सरसावले. 

पंतप्रधानांनी आर्थिक मदतीचं आवाहन केल्यानंतर कलाविश्वातूनही बऱ्याच सेलिब्रिटींनी पुढे येत या संकटसमयी देशाला सावरण्यात मोलाचा हातभार लावला. अभिनेता सलमान खानही यामध्ये मागे राहिला नाही. जवळपास २५ हजार कामगारांना आर्थिक मदत करण्याचा सलमानचा मानस होता. ज्यासाठी त्याने ने इंडस्ट्रीच्या मातृ संस्था फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजला (FWICE)फोन करून २५ हजार कामगारांच्या बँक खात्यांचा तपशील मागवला होता. 

'राधे' चित्रपटातील क्र्यू मेंबर्सना आर्थिक मदतीचा हात 

बॉलिवूड लाईफच्या वृत्तानुसार सलमानने दिलेला शब्द पाळण्यास सुरुवात केली आहे. सध्याच्या घडीला त्याने 'राधे' या चित्रपटातील सर्व क्र्यू मेंबर्सच्या खात्यात त्याने पैसे जमा केले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार २६ मार्च ते २ एप्रिलपर्यंत 'राधे' या चित्रपटासाठी ही मंडळी काम करणार होती. पण, लॉकडाऊन झाल्यामुळे चित्रपटाचं काम अर्ध्यावरच थांबलं. काम थांबल्यामुळे या कामगारांपुढे आर्थिक अडचणीचा मोठा प्रश्न उभा राहिला. ज्यामुळे त्यांना दैनंदिन जीवनातही बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं. 

 

संघर्षाच्या आणि आव्हानाच्या या काळात चित्रपटामध्ये मेकअप आर्टीस्ट म्हणून काम पाहणाऱ्या सुभाष कपूर यांनी आपल्याला सलमानकडून मदत मिळाल्याचं सांगितलं. भाईजानने दिलेला हा मदतीचा हात पाहता एक अभिनेता म्हणून त्याच्याप्रती जितकी आपुलकी वाटते तितकाच एक व्यक्ती म्हणून सर्वांना त्याचा सार्थ अभिमान वाटत आहे.