फरहानच्या नात्यावर जावेद यांचे वक्तव्य

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर या जोडीवर अनेक चाहत्यांच्या नजरा खिळलेल्या आहेत.

Updated: Jan 14, 2020, 02:27 PM IST
फरहानच्या नात्यावर जावेद यांचे वक्तव्य

मुंबई : बॉलिवूडमध्ये कधी कोणाचे नाव कोणासोबत जुळेल हे सांगता नाही. त्याप्रमाणे प्रेमविरह, सोडचिठ्ठी अशा अनेक चर्चा सेलेब्रिटींमध्ये कायम रंगत असतात. आता सध्या फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर या जोडीवर अनेक चाहत्यांच्या नजरा खिळलेल्या आहेत. शिवाय त्यांच्या विवाहाच्या चर्चा देखील सर्वत्र रंगताना दिसत आहे. पण अद्याप दोघांकडूनही विवाहबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

मीडिया रिपोर्टनुसार नुकताच झालेल्या एका मुलाखतीत प्रसिद्ध गितकार जावेद अख्तर यांना फरहानच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा याबद्दल मला काहीच माहित नाही असं उत्तर देत ते म्हणाले, 'फरहानच्या लग्नाबद्दल मी आता ऐकले आहे. मी फरहान वाढदिवसाच्या दिवशी त्याच्यासोबत होतो. पण तो मला काहीच म्हणाला नाही.' असं वक्तव्य त्यांनी यावेळेस केलं. 

तर मुलं पालकांपासून खूप काही लपवतात असं सांगत शिबानी चांगली मुलगी आहे असे देखील ते म्हणाले. फरहान आणि शिबानी नेहमी त्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. फरहानचा घटस्फोट झाला आहे शिवाय त्याला दोन मुली देखील आहे. त्याच्या पत्नीचे नाव अधुना आहे. २००२ साली त्यांनी विवाह केला होता. 

१५ वर्षांच्या सुखी संसारानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तर शिबानीच्या आधी फरहान  अभिनेत्री श्रद्धा कपूरला डेट करत असल्याची चर्चा होती. पण दोघांनी कधी त्यांच्या नात्याला दुजोरा दिला नाही.

दरम्यान, फरहान आणि शिबानीने काही दिवसांपूर्वी केलेली सोशल मीडिया पोस्ट पाहता त्या दोघांचाही साखरपुडा झाल्याच्या चर्चा आहेत. पण, त्या वृत्तालासुद्धा दुजोरा देण्यात आलेला नाही. त्यामुळे आता चाहते आणि साऱ्या कलाविश्वाचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे या बहुप्रतिक्षित विवाहसोहळ्यावर.