शरद पोंक्षे - स्नेह पोंक्षे बाप-लेकाची ही जोडी पहिल्यांदाचा प्रेक्षकांच्या भेटीला...

Sharad Ponkshe and Sneh Ponkshe Together :  शरद पोंक्षे आणि त्यांचा मुलगा पहिल्यांदाच या चित्रपटानिमित्तानं आले एकत्र

दिक्षा पाटील | Updated: Jun 27, 2024, 03:39 PM IST
शरद पोंक्षे - स्नेह पोंक्षे बाप-लेकाची ही जोडी पहिल्यांदाचा प्रेक्षकांच्या भेटीला... title=
(Photo Credit : Social Media)

Sharad Ponkshe and Sneh Ponkshe Together : काही दिवसांपूर्वीच शरद पोंक्षे आणि त्यांचा मुलगा स्नेह पोंक्षे यांनी आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. वडील मुलाची ही जोडी प्रेक्षकांसाठी काय जबरदस्त घेऊन येणार. हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक होतेच. मात्र, यावरील पडदा आता उठला असून  'बंजारा' असं या चित्रपटाचं नाव आहे. आयुष्याच्या प्रवासावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे, हे पहिल्याच झलकमध्ये कळतंय. चित्रपटाचं नाव जरी जाहीर झालं असलं तरी या चित्रपटात कोण कोण कलाकार झळकणार, हे जाणून घेण्यासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

मराठी कलाक्षेत्रातील एक नामवंत नाव म्हणजे शरद पोंक्षे आहे. नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यानंतर आता शरद पोंक्षे 'बंजारा' चित्रपटातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत. लक्षवेधी गोष्ट म्हणजे या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन त्यांचा सुपुत्र स्नेह पोंक्षे करणार आहे. दिग्दर्शक म्हणून स्नेहचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे प्रेक्षकांना काहीतरी भन्नाट आणि मनोरंजनात्मक पाहायला मिळणार, हे नक्की!

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

याबद्दल निर्माते शरद पोंक्षे म्हणतात, 'लेकाच्या चित्रपटाच्या माध्यमातून मी निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. यापेक्षा वेगळा आनंद काही असूच शकत नाही. स्नेहच्या मनात 'बंजारा'चा विचार आल्यापासून ते चित्रीकरणापर्यंतचा प्रवास मी पाहिला आहे. खरंतर हा विषय वेगळा आहे. सर्वच वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल असा हा चित्रपट आहे. खरंतर, आयुष्यात प्रत्येक मनुष्य हा 'बंजारा' असतोच. चित्रपट पाहाताना याचा अनुभव येईलच.' 

दिग्दर्शक स्नेह पोंक्षे म्हणतो, 'वडिलांसोबत प्रथमच काम करत आहे. त्यांच्या अनुभवाची मला खूपच मदत झाली. कुठे जायचंय, यापेक्षा तिथे जायचा प्रवास आनंददायी हवा, परंतु याच आनंदाला आपण बऱ्याचदा मुकतो. याचं महत्त्व अधोरेखित करणारा 'बंजारा' आहे.  मला खात्री आहे, हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल.'

 हेही वाचा : सोनाक्षी सिन्हानं 2 वर्षांपूर्वीच गुपचूप केला होता साखरपुडा! आता 'तो' फोटो होतोय VIRAL

दरम्यान, मोरया प्रॉडक्शन्स आणि वि. एस. प्रॉडक्शन्स सादर करीत असलेल्या या चित्रपटाचे शरद पोंक्षे आणि रोहिणी विजयसिंह राजे पटवर्धन निर्माते आहेत. या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण हे सिक्कीममध्ये झाले आहे. त्यामुळे आता शरद पोंक्षेंच्या मुलाला म्हणजेच स्नेहच्या चित्रपटाला पाहण्यासाठी सगळेच आतुर आहेत.