देवाच्या दारी अभिनेत्रीला विचारली जात, पतीकडे मागितला हिंदू असल्याचा पुरावा; Video Viral

Viral Video : मंदिराच्या दारातच घडलेला प्रकार जसाच्या तसा... अभिनेत्रीनं व्हिडीओच्या माध्यमातूनच व्यक्त केला संताप   

सायली पाटील | Updated: Aug 27, 2024, 12:58 PM IST
देवाच्या दारी अभिनेत्रीला विचारली जात, पतीकडे मागितला हिंदू असल्याचा पुरावा; Video Viral  title=
South indian actress namitha asked proof for being hindu in tamilnadu temple

Viral Video : सहसा मंदिरांमध्ये जात असताना काही नियमांचं पालन करणं अपेक्षित असतं. पण, याच नियमांच्या नावाखाली मर्यादा ओलांडल्या जात असतील तर मात्र ही बाब अतिशय गंभीर ठरू शकते. नुकताच एका अभिनेत्रीसोबत घडलेल्या संपूर्ण प्रकार पाहता हेच स्पष्ट होत आहे. कारण, या अभिनेत्रीला एका प्रसिद्ध तीर्थक्षेत्री गेलं असता अतिशय अनपेक्षितपणे विचित्र अनुभव आला आणि या अनुभवाला तिनं सोशल मीडियाच्या माध्यमाकून वाचा फोडली. 

दाक्षिणात्य अभिनेत्री आणि भाजप नेता म्हणून नावारुपास आलेल्या नमितानं सोशल मीडियाच्या माध्यमातून खळबळजनक दावे केले आहेत. उपलब्ध माहितीनुसार सोमवारी अभिनेत्री मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिरत दर्शनासाठी पोहोचली होती. पण, यावेळी देवाच्या दारी आपल्याकडे हिंदू असल्याचा पुरावा मागण्यात आला असा दावा तिनं केला. 

इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून व्हिडीओ शेअर करत तिनं याबाबतची माहिती दिली. नमितानं केलेल्या आरोपांनुसार मंदिर प्रशासनातील एका व्यक्तीनं तिला मंदिरात जाण्यापासून रोखलं आणि तिच्यासह तिच्या पतीकडे हिंदू असण्याचा पुरावा मागितला. 

आपल्यासोबत घडलेला प्रसंग अतिशय विचित्र आणि गंभीर असल्याचं सांगताना नमितानं व्हिडीओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'हे असं पहिल्यांदाच घडतंय की मला माझ्याच देशामध्ये वेगळं असल्याची जाणीव करून देण्यात आली आहे. बरं इतकंच नव्हे तर मला माझं हिंदूत्वंही सिद्ध करावं लागलं आहे. मला हिंदू असल्याचं सिद्ध करावं लागेपर्यंतही ठिक पण, ते सांगण्याची पद्धतही अतिशय योग्य होती. एका अतिशय उद्दाम अधिकाऱ्यानं आणि त्याच्या सहाय्यकानं मला ही वागणूक दिली होती.'

हेसुद्धा वाचा : शिवरायांचा पुतळा कोसळल्याचं समजताच रितेश देशमुख भावुक! हात जोडत अवघे 3 शब्द बोलला

 

आपण हिंदू असून लग्नही तिरुपती मंदिरात झालं आहे हे तर जगजाहिर आहे असं सांगताना आपल्या मुलाचं नावही कृष्णाच्याच नावावरून ठेवल्याचं अभिनेत्रीनं सांगितलं. पीटीआटच्या वृत्तानुसार नमिताच्या मते तिच्यासोबत मंदिराच्या दारी अधिकाऱ्यांकडून मर्यादा सोडून वागण्याक आलं. इतकंच नव्हे, तर धर्म सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्रही मागण्यात आलं. 

दरम्यान, अभिनेत्रीनं हे आरोप करताच आणि प्रकरण गंभीर वळणाव पोहोचताच मंदिर प्रशासनाकडूनही त्याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं. अभिनेत्री आणि तिच्या पतीनं तोंडावर मास्क लावल्यामुळं त्यांना धर्म, जातीविषयी विचारत मंदिर आणि तेथील परंपरांची माहिती देण्यात आल्याचं मंदिर प्रशासनानं सांगितलं. 

वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार अपेक्षित उत्तर मिळताच अभिनेत्री आणि तिच्या पतीच्या कपाळी टीळा लावत त्यांना मंदिरात पाठवण्यात आलं.  नमिताच्या सांगण्यानुसार मात्र धर्माविषयी माहिती मिळाल्यानंतर आणि स्पष्टीकरण दिल्यानंतरच आपल्या कपाळी टीळा लावत त्यानंतर मंदिरात प्रवेश देण्यात आला. विचारपूस करण्याचीही एक पद्धत असते. आपल्याला तिथं 20 मिनिटं वाट पाहायला लावत पोलिसांना आपल्या येण्याची कल्पना असतानाही असं घडल्याचं सांगत, आपल्या जाण्यानं तिथं कोणतीही गैरसोय होणार नाही याच हेतूनं मास्क घातल्याचं कारणही अभिनेत्रीनं पुढे केलं.