कोल्हापूरचा रांगडा राणा मुंबईत स्थिरावेल का?

राणाचा हा प्रवास कसा असेल?

मुंबई : झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने सध्या लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. राणादा आणि पाठकबाई यांची निरागस,निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेने नुकतेच ५०० भागांचा टप्पा पार केला. राणादा आणि पाठकबाई यांच्यावर सबंध महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. ऑनस्क्रीन भोळा तसेच रांगडा दिसणारा पेहलवान पठ्ठा राणादा ऑनस्क्रीन अगदी खरा पेहलवान कुस्तीपटू दिसण्यासाठी त्याच्या फिटनेस आणि डाएटकडे खूप लक्ष देतो. सध्या मालिकेत राणा मॅटवरील कुस्तीचा सराव करत आहे आणि त्यासाठी त्याचा पल्ला एका लेडी मॅनेजरशी पडलाय.

कोल्हापुरात वाढलेल्या राणाचा मुंबईमध्ये निभाव लागणार नाही असं ठाम मत सखी अंजलीकडे व्यक्त करते पण तिच्या बोलण्याला न जुमानत अंजली तिचं हे आव्हान स्वीकारते आणि राणाला मुंबईमध्ये घेऊन येते. सखी आणि अंजली राणाला या स्वप्ननगरी मुंबईमध्ये एकट्याने प्रवास करून बालसरा यांच्या ऑफिसला यायला सांगतात. बावरलेला राणा मुंबईमध्ये पहिल्यांदाच येतो आणि त्याचं स्वागत मुंबईच्या पाकिटमाराने होतं जो त्याचं पाकीट मारतो. लोकल ट्रेनच्या लेडीज कंपार्टमेंटमध्ये चुकून चढणे, भूक लागलेली असताताना पैसे नसल्यामुळे डबेवाल्याचं जेवण खाणे या सगळ्या प्रसंगांना सामोरं जाऊन राणा मुंबईची एक वेगळीच बाजू अनुभवतो.

कोल्हापूरच्या रांगड्या मातीत चित्रीकरण होणाऱ्या 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेचं पहिल्यांदाच धकाधकीचं जीवन असलेल्या मुंबईमध्ये चित्रीकरण झालं आणि त्याबद्दलचा अनुभव शेअर करताना राणा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी म्हणाला, "मायानगरी मुंबईमध्ये चित्रीकरण करण्याचा अनुभव भन्नाट होता. आपण असं म्हणतो कि मुंबईमध्ये कोणाला वेळ नसतो, सगळे घडाळ्याच्या काट्यावर चालतात पण जेव्हा आम्ही चित्रीकरण करत होतो तेव्हा पाऊस असताना देखील सर्व जण थांबून शूटिंग पाहत होते. अनेक चाहते भेटले, त्यांनी आमच्या कामाचं कौतुक केलं. लोकल व रेल्वे प्लॅटफॉर्मवर शूट करताना देखील तेथील प्रेक्षकांना एक सुखद धक्काच मिळाला. खुद्द राणाला समोर बघून सगळे स्थिरावले. मला पहिल्यांदा कॅन्डीड शूटचा अनुभव घ्यायला मिळाला. चाहत्यांची रेलचेल चालूच होती पण त्यांना चित्रीकरणाचं गांभीर्य समजावल्यावर त्यांनी देखील सहकार्य केलं."