पावसाळा सुरु झाला की, साथीचे आजार डोकं वर काढतात. मुंबईत अशाच साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यीच माहिती समोर आली आहे. पावासाळ्यात साथीच्या आजारांमध्ये वाढ होत असली तरी जून व जुलैच्या तुलनेत मुंबईमध्ये हिवताप, डेंग्यू, चिकूनगुन्या व लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. स्वाईन फ्लू व कावीळच्या रुग्णांमध्ये फारशी वाढ झालेली नाही तर गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये लक्षणीय घट झाली आहे.
पावसाळा सुरू होताच गॅस्ट्रोच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्याखालोखाल हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. जून व जुलैमध्ये या आजारांच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत होती. मात्र जुलैमध्ये स्वाईन फ्लूने अचानक डोके वर काढले. जुलैमध्ये जोरदार झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना वाढल्या. परिणामी साचलेल्या पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागला. त्यामुळे लेप्टोचे रुग्णही वाढू लागले. त्यामुळे गॅस्ट्रो, हिवताप, डेंग्यूपाठोपाठ लेप्टो व स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली. मात्र ऑगस्टमध्ये अधूनमधून होत असलेला पाऊस व वाढते ऊन यामुळे हिवताप, डेंग्यू व लेप्टोच्या रुग्णांबरोबरच चिकुनगुन्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईत हिवतापाचे ११७१ रुग्ण, डेंग्यूचे १०१३ रुग्ण, लेप्टोचे २७२ रुग्ण, चिकूनगुन्याचे १६४ रुग्ण, कावीळ १६९ आणि स्वाईन फ्लूचे १७० रुग्ण सापडले आहेत. मात्र गॅस्ट्राेच्या रुग्णांच्या संख्येत घट झाली असून, गॅस्ट्रोचे 694 रुग्ण सापडले आहेत.
राज्यात 21 ऑगस्टपर्यंत डेंग्यूने 12 जणांचा बळी घेतला होता. मात्र पुढील आठवडाभरात छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ऑगस्टमध्ये डेंग्यूच्या मृतांची संख्या 14 झाली. तर जानेवारीपासून आतापर्यंत राज्यात डेंग्यूच्या मृतांची संख्या 17 इतकी झाली आहे.
मुंबईप्रमाणे राज्यातही चिकुनगुन्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. मुंबईमध्ये जून व जुलैमध्ये आवाक्यात असलेल्या चिकुनगुन्याच्या रुग्णांमध्ये ऑगस्टमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये मुंबईमध्ये चिकुनगुन्याचे १६४ रुग्ण सापडले असून, राज्यामध्ये ११२३ इतके रुग्ण सापडले आहेत.
आजार | जून | जुलै | ऑगस्ट |
मलेरिया | 443 | 797 | 1171 |
डेंग्यू | 93 | 535 | 1013 |
लेप्टो | 28 | 141 | 272 |
गॅस्ट्रो | 722 | 1239 | 694 |
कावीळ | 99 | 146 | 169 |
चिकनगुनिया | 0 | 25 | 164 |