कॅन्सरचा धोका दूर ठेवण्यासाठी आहारात हवेच हे '5' पदार्थ

कॅन्सर हा एक दुर्धर आजार आहे. 

Updated: Jul 4, 2018, 05:23 PM IST
कॅन्सरचा धोका दूर ठेवण्यासाठी आहारात हवेच हे '5' पदार्थ

मुंबई : कॅन्सर हा एक दुर्धर आजार आहे. खाण्यापिण्याच्या, लाईफस्टाईलमध्ये झालेल्या अनेक बदलांमुळे आजकाल आपणच काही आजारांचा धोका वाढवला आहे. अशांपैकी एक म्हणजे कॅन्सर. आजकाल वैद्यशास्त्रामध्ये अनेक नवेनवे शोध आणि बदल होत असल्याने या आजारावर मात करणं शक्य झालं आहे. 

नियमित आरोग्याच्या तपासण्या, संतुलित आहार आणि व्यायामाच्या मदतीने तुम्ही कॅन्सरचा धोका वेळीच ओळखू शकता. सोबतच कॅन्सरचं निदान झाल्यानंतरही काही सकारात्मक बद्लांनी तुम्ही दुर्धर कॅन्सरवरही मात करु शकता. मग पहा आहारात अशा कोणत्या पदार्थांचा समावेश करणं हितकारी ठरतं? 

आहारात कोणत्या पदार्थांचा कराल समावेश ? 

आलं - 

अनेक घरात वर्षांनुवर्ष आहारात हमाखास आल्याचा समवेश केला जातो. आल्यामध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक मुबलक आहेत. त्यामुळे कॅन्सर सेल्सशी सामना करणं सुकर होते. नियमित आहारात आल्याचा समावेश केल्यास कोलेस्ट्रेरॉल कमी होईल, रक्त साचून राहण्याचं प्रमाण कमी होईल. अ‍ॅन्टी फंगल आणि कॅन्सरशी सामना करण्याची क्षमता सुधारते. 

लसूण - 

आहारात आल्यासोबत लसणाचा समावेश केला जातो. लसणाच्या उग्र वासामुळे काहीजण त्याचा आहारात समावेश टाळतात. मात्र फोडणीसाठी किंवा पेस्टच्या स्वरूपात त्याचा आहारात समावेश वाढवा. लसणातील एलियम हे अ‍ॅन्टिबायोटिक घटक कॅन्सरशी सामना करण्यास सक्षम ठरतात. लसणामुळे रक्तदाब, पोटाचे विकार, पित्त, पचनाचे त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते. 

आवळा - 

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी घटक मुबलक असतात. व्हिटॅमिन सीच्या बाबतीत एक आवळा तीन संत्र्यांच्या बरोबरीचा असतो. आवळ्यामुळे यकृताचे कार्य सुधारते. आवळ्यामुळे शरीरातून विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. आवळ्याच्या रसामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते. अनेक आजारांवर आवळा फायदेशीर आहे. 

ग्रीन टी - 

ग्रीन टी मध्ये पॉलीफेनॉल्स घटक आढळतात. या अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटकांमुळे कॅन्सर सेल्स वाढण्याचा धोका कमी होतो. साखरेशिवाय चहा बनवणं अधिक फायदेशीर आहे. गोडव्यसाठी तुम्ही साखरेऐवजी मध वापरू शकता. 

रताळं- 

कॅन्सर सेल्सची वाढ रोखण्यासाठी बीटा कॅरोटीन घटक फायदेशीर ठरतात. केवळ उपवासापुरतं मर्यादीत असलेलं रताळं तुम्ही नियमित आहारात समाविष्ट करू शकता. बीटा कॅरोटीनसोबतच रताळ्यामध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात. गाजर, भोपळ्यामध्येही बीटा कॅरोटीन घटक मुबलक प्रमाणात आढळतात.