जयपूर : राजस्थानमधील भीलवाडामध्ये कोरोना व्हायरस दरम्यान नियमांचं पालन न करता लग्न करणं संपूर्ण कुटुंबाला चांगलंच महागात पडलं आहे. एका लग्नात सामिल झालेल्या तब्बल 16 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर लग्नात सामिल झालेल्यांपैकी 58 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
जिल्हा प्रशासनाने या कुटुंबाविरोधात केवळ गुन्हाच दाखल केला नसून 6 लाख रुपयांहून अधिक दंड तीन दिवसांत भरण्याचं सांगितलं आहे.
या कुटुंबातील मुलाचं लग्न 13 जून रोजी पार पडलं. लग्नासाठी ज्यावेळी कुटुंबियांनी परवानगी घेतली, त्यावेळी प्रशासनाकडून लग्नात अधिकाधिक 50 लोकांच्या उपस्थितीच्या अटीवर परवानगी देण्यात आली. परंतु लग्नात 50हून अधिक लोक सामिल झाले. लग्नात नवऱ्यामुलासह 16 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं.
विशेष बाब म्हणजे, कोरोना संसर्गावर प्रभावी नियंत्रणासाठी भीलवाडा मॉडेलची चर्चा देशभरात झाली होती. जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेत आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम 51 अंतर्गत आणि सामान्य लोकांचं जीवन धोक्यात आणल्याबद्दल भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हाधिकारी राजेंद्र भट्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नात 50हून अधिक लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. तसंच या लग्न समारंभादरम्यान, कोरोनापासून वाचण्यासाठी सोशल डिस्टंन्सिंग पाळणं, मास्क घालणं यांसारख्या नियमांचं पालन केलं गेलं नसल्याचं सांगितलं.
या लग्नात सामिल झालेल्या व्यक्तीला पहिल्यांदा 19 जून रोजी कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यानंतर एकूण 16 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून एक जण दगावलाही आहे. आणखी काही जणांना लागण होऊ शकत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या लग्नात सामिल झालेल्या 15 जणांना रुग्णालयात दाखल केलं आहे, तर 58 लोक क्वारंटाईनमध्ये आहेत. या प्रकरणात राज्य सरकारला क्वारंटाईन केंद्र, क्वारंटाईन केंद्र सुविधा, अन्न, वाहतूक आणि रुग्णवाहिका इत्यादींच्या सुमारे 6,26,000 रुपयांचा महसूल तोटा झाला आहे. तहसीलदारांना तीन दिवसांत ही रक्कम गोळा करुन मुख्यमंत्री मदत निधीमध्ये जमा करण्याचं या कुटुंबाला सांगण्यात आलं आहे.