आनंदाची बातमी: सलग दुसऱ्या दिवशी देशातील नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

भारत आता २० हजारांचा टप्पा ओलांडणार, अशी भीती व्यक्त केली जात होती. 

Updated: Jun 30, 2020, 10:36 AM IST
आनंदाची बातमी: सलग दुसऱ्या दिवशी देशातील नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट title=

नवी दिल्ली: गेल्या आठवडाभरापासून रुग्णसंख्येच्या बाबतीत दररोज नवे उच्चांक गाठणाऱ्या कोरोनाचा देशातील प्रादुर्भाव गेल्या २४ तासांत काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले. रविवारी देशात कोरोनाचे १९,९०६ रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे भारत आता २० हजारांचा टप्पा ओलांडणार, अशी भीती व्यक्त केली जात होती. परंतु, सुदैवाने काल आणि आज कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे १८,५२२ नवे रुग्ण आढळून आले. हा आलेख असाच खालावत गेल्यास भारताला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, गेल्या २४ तासांत देशात ४१८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  त्यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या १६,८९३ इतकी झाली आहे.

भारतात कोरोनाची पहिली लस विकसीत, जाणून घ्या कोणत्या टप्प्यावर पोहोचली चाचणी

सध्याच्या घडीला देशभरात ५,६६,८४० कोरोना रुग्ण आहेत. यापैकी २,१५,१२५ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ३,३४,८२२ जण कोरोनातून बरे होऊन घरी परतल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.
महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेले राज्य आहे. सोमवारी दिवसभरात महाराष्ट्रात कोरोनाचे ५२५७ नवे रुग्ण आढळून आले होते. सध्या राज्यात मृत्यूदर हा ४.४८ टक्के इतका आहे. तर काल राज्यात २३८५  रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत राज्यातील ८८,९६० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

पांडुरंगा.... एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपुरात सापडले सात कोरोना पॉझिटिव्ह

सध्याच्या घडीला महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात आणि दिल्लीत सध्या कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. केंद्रीय पथकाने नुकताच महाराष्ट्राचा दौराही केला होता. यावेळी केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी, रुग्णांची संख्या वाढली तरी घाबरून जाऊ नका, पण मृत्यूदर नियंत्रणात ठेवा, असे डॉक्टरांना सांगितले होते.