दिलासा : देशातील सर्वाधिक वयोवृद्ध कोरोनाग्रस्त दाम्पत्याला रुग्णालयातून डिस्चार्ज

घरी पाठवण्यात आलं असलं तरीही त्यांच्यावर आरोग्य विभागाचं लक्ष असणार आहे

Updated: Apr 8, 2020, 11:08 AM IST
दिलासा : देशातील सर्वाधिक वयोवृद्ध कोरोनाग्रस्त दाम्पत्याला रुग्णालयातून डिस्चार्ज  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

तिरुवअनंतरपूरम :  कोरोना coronavirus व्हायरसची दहशत देशभरात फोफावत असतानाच या आव्हानात्मक परिस्थितीत काही आशादायी घटनाही घडत आहेत. या घटना आरोग्य क्षेत्रासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहेत. सध्या केरळमधील ९३ वयाच्या थॉमस आणि त्यांच्या ८८ वर्षीय पत्नी मरियम्मा यांना कोरोनातून मुक्त झाल्यानंतर रुग्णालयातून रजा देण्यात आली आहे. 

केरळच्या कोट्टायम येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु सुरु होते. ज्यामध्ये यशस्वीरित्या कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना घरी परत पाठवण्यात आलं. थॉमस आणि त्यांची पत्नी मरियम्मा यांची नव्याने करण्यात आलेली कोरोनाची चाचणी निगेटीव्ह आली. ज्यानंतर त्यांना घरी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

मुळच्या पथनमथित्ता जिल्ह्यातील रान्नी गावचे असणाऱ्या थॉमस आणि मरियम्मा यांना ९ मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. इटलीहून परतलेल्या त्यांचा कुटुंबीयांमुळे या वृद्ध दाम्पत्यालाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. पण, आता मात्र ते यातून सावरले असल्यामुळे हा एक चमत्कारच म्हटला जात आहे. 

दरम्यान, थॉमस आणि त्यांच्या पत्नीला घरी पाठवण्यात आलं असलं तरीही त्यांच्यावर आरोग्य विभागाचं लक्ष असणार आहे. काही आठवड्यांनंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात आणून पुन्हा काही चाचण्या होतील. मुख्य म्हणजे एकिकडे कोरोनाची लागण झालेली असतानाच त्यांना आधीपासूनच मधुमेह, हायपरटेंशन, आणि कार्डिऍकसारखे आजार असल्याची बाबही समोर आली होती. त्यामुळे हे एक आव्हानच होतं. 

 

केरळमधील या रुग्णांवर उपचार करण्याचा पहिला टप्पा अतिशय कठीण होता. यादरम्यानच थॉमस यांना हृदयविकाराचा झटकाही आल्याचं सांगण्यात येतं. अखेर त्यांच्यासाठी कृत्रिम ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची मदत घ्यावी लागली. पण, अखेर या दोघांनीही कोरोनाला शरणागती पत्करायला भाग पाडलं हेच खरं. आरोग्य विभागाचं हे यश पाहता केरळच्या आरोग्य मंत्र्यांकडून डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं आहे.