पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय सैन्याचं चोख प्रत्युत्तर

पुंछ जिल्ह्यातील मेंढर सेक्टरमध्ये गोळीबार...

Updated: Jan 18, 2020, 04:55 PM IST
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय सैन्याचं चोख प्रत्युत्तर  title=
संग्रहित फोटो

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. दुपारच्या सुमारास पाकिस्तानकडून, पुंछ जिल्ह्यातील मेंढर सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला. जवळपास एक तासापर्यंत गोळीबार सुरु होता. मात्र, पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय जवानांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. 

पाकिस्तानने, जम्मू-काश्मीरमधील राजोरी आणि पुंछ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषा तोडत रहिवाशी आणि सैन्य तळांवर गोळीबार केला. एक तासापर्यंत चाललेल्या गोळीबारानंतर पाकिस्तानकडून गोळीबार थांबवण्यात आला. परंतु पुन्हा पाकिस्तानकडून नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार सुरु झाला. भारतीय सैन्याकडून गोळीबाराला चांगलंच प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

पाकिस्तानी सैन्य, २६ जानेवारी रोजी अतिरेकी कारवायांसाठी नियंत्रण रेषेत घुसखोरी करण्यासाठी दहशतवाद्यांना कव्हर फायर देत आहे. दोन दिवसांपूर्वी राजौरी सेक्टरमधील तारकुंडी भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ८ दहशतवाद्यांच्या पथकाला भारतीय सैन्याने पळवून लावलं होतं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहिवासी वस्तीत दोन ते तीन दशहतवादी घुसले होते. याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने परिसराला वेढा घातला. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली.  सुरक्षा दलाने त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं.