कोलकाता : पश्चिम बंगालच्या अगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पश्चिम बंगालमध्ये चिखलफेक करण्यास सुरुवात झाली असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मर्यादा ओलांडत नरेंद्र मोदी यांच्यावर दानव, रावण अशा शब्दात खोचक टीका केली आहे.
बंगालमध्ये गुंडा राज चालु देणार नाही- ममता बॅनर्जी
ममता बॅनर्जी यांनी एका सभेला संबोधित करताना त्यांनी भाजपवर टीका केली. 'तृणमूल काँग्रेसला ते टोलबाज म्हणतात. पण भाजप दंगाबाज, धंदेबाज आहे. बंगालवर तर केवळ बंगालच शासन करेन बंगालवर गुजरात शासन करणार नाही. आम्हाला बंगाल नाही, बांग्ला पाहिजे. मोदी बंगालवर राज करु शकणार नाही.' असं देखील ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीआधी राजकीय आरोप-प्रत्यारोप आता सुरु झाले आहेत. राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आपला गड राखायचा आहे. भाजप त्यांच्या गडाला सुरुंग लावणार की ममता बॅनर्जी आपला गड राखणार याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे.
निवडणुकीच्या आधी भाजप आणि तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद देखील वाढत आहे. आतापर्यंत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेकदा झडप आणि हल्ले झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात आणखी संघर्ष पाहायला मिळेल.