राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस कार्यकारिणीची आज बैठक

काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच काँग्रेस कार्यकारिणी समिती बैठकीचं अध्यक्षपद भूषणवणार आहेत. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 22, 2017, 10:32 AM IST
राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस कार्यकारिणीची आज बैठक title=

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच काँग्रेस कार्यकारिणी समिती बैठकीचं अध्यक्षपद भूषणवणार आहेत. 

बैठकीच्या सुरुवातीला काँग्रेस कार्यकारिणीकडून राहुल गांधींचं औपचारिक स्वागत करण्यात येईल. या बैठकीत गुजरात विधानसभा निवडणूक निकाल आणि आगामी राजकारणाची दिशा यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. 

टू जी घोटाळ्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर भाजपला घेरण्यासाठी रणनीतिही या बैठकीत ठरवण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिलीय. टूजी घोटाळ्याचा मुद्दा काँग्रेस जनतेपर्यंत घेऊन जाण्याच्या विचारात आहे. कारण 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मोदींनी या घोटाळ्यावरुन काँग्रेसला घेरलं होतं. 

यूपीए-2च्या काळातील भ्रष्टाचार हा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाचं प्रमुख कारण होतं असं बोललं जातं. या मुद्यासोबत पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान बैठकीच्या अजेंड्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.