नवी दिल्ली : कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम याने आखलेला गुडं छोटा राजनच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. छोटा राजन सध्या तिहार कारागृहात शिक्षा भोगत आहे. स्थानिक गुंडांना हाताशी धरून राजन याची हत्या घडवून आणायची असा तो कट होता. मात्र, या कटाची खबर लागताच तिहार प्रशासनाने दाऊदचा कट उधळून लावला.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, दिल्लीतील गॅंगस्टर नीरज बावना याला हाताला धरून दाऊद कंपनीने राजनच्या हत्येचा कट रचला. पण, या कटात सहभागी असलेल्या एका सहकाऱ्याने दारूच्या नशेत बरळत या कटाची माहिती दुसऱ्या एका साथिदाराला दिली. महत्त्वाचे असे की, बावनाचा हा सहकारी काही दिवसांपूर्वीच तिहार जेलमधून सुटला आहे. कारागृहाबाहेर पडलेल्या या सहकाऱ्यामुळेच दाऊदचे षडयंत्र बाहेर आले. बावना सध्या तिहार कारागृहात शिक्षा भोगत आहे.
दरम्यान, या कटाची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने पावले उचलत बावनाला दुसरीकडे हालवण्यात आले. सध्या बावनाचा मुक्काम हाय रिस्क वॉर्डात आहे. काही दिवसांपूर्वीच प्रशासनाने त्याच्या बराकीतून मोबाईल जप्त केले होते. या कटामुळे खडबडून जागे झालेल्या कारागृह प्रशासनाने छोटा राजनच्या सुरक्षेत वाढ केली आहे. खास करून त्याला विशेष सुरक्षा आणि स्वयंपाकीही ठेवण्यात आला आहे. सध्या राजन अधिक सुरक्षीत असल्याची माहिती कारागृह अधीकाऱ्यांनी सूत्राला दिली आहे.