दाका : असे म्हणतात की, प्रेमात आणि युद्धात व्यक्ती काहीही करण्याची तयारी दाखवतो. परंतु एका महिलेनं प्रेमापोटी खूप मोठं पाऊल उचललं आहे. ज्याचा तुम्ही विचार देखील करणार नाही. आपल्या प्रियकराशी लग्न करण्यासाठी बांगलादेशातून सीमा ओलांडून तरुणी भारतात आली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 22 वर्षीय तरुणीने तिच्या 'बॉयफ्रेंड'साठी एवढं अंतर पोहून कापलं. त्या मुलीने आपल्या प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी भारताची सीमा तर ओलांडलीच, पण त्याहून महत्वाचं म्हणजे ती पाण्यातून पोहत बांगलादेश मधून भारतात पोहोचली.
या घटनेमुळे ही तरुणी चर्चेचा विषय ठरली आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर या दोघांची प्रेम कहाणी ट्रेंड करु लागली आहे.
मुलीने सुंदरबनची जंगली जंगलेही पार केली. शिवाय जीव धोक्यात घालून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करून सर्व कायदे मोडले.
कृष्णा मंडल असे या तरुणीचे नाव आहे. कृष्णाची फेसबुकवर अभिक मंडळा नावाच्या व्यक्तीशी भेट झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. अभिकला भेटण्यासाठी हताश झालेल्या कृष्णाजवळ वैध पासपोर्ट नसल्याने तिने पाण्यात पोहणे पसंत केले आणि पाण्यातून पोहत भारतात पोहोचली.
रॉयल बंगाल टायगर्ससाठी लोकप्रिय असलेल्या सुंदरबनमध्ये कृष्णाने पहिल्यांदा प्रवेश केल्याचा दावा पोलिस सूत्रांनी केला आहे. या सगळ्यात धोकादायक जंगलातून तिनं आधी प्रवास केला, ज्यानंतर तिने समुद्रातून पोहोत उर्वरीत अंतर कापलं.
ही तरुणी नंतर तिचा प्रियकर अभिकला भेटली आणि नंतर कोलकाता येथील कालीघाट मंदिरात दोघांनी लग्न देखील केलं.
बेकायदेशीरपणे देशात प्रवेश केल्याप्रकरणी कृष्णाला सोमवारी अटक करण्यात आली. कृष्णाला आता बांगलादेश उच्चायुक्तांकडे सोपवण्यात येणार असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.
बेकायदेशीरपणे कोणी सीमा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही महिन्यांपूर्वी एक बांगलादेशी तरुण त्याच्या आवडत्या चॉकलेट खरेदी करण्यासाठी सीमा ओलांडून गेला होता.