Good News । रेपो दरात कपात, गृह कर्जाचा EMI होणार कमी

गृह कर्ज घेतलेल्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. 

Updated: May 22, 2020, 11:40 AM IST
Good News । रेपो दरात कपात, गृह कर्जाचा  EMI होणार कमी title=
संग्रहित छाया

मुंबई : गृह कर्ज घेतलेल्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी मोठी घोषणा केली. रेपो दरात ०.४ टक्क्यांची कपात केली. रेपो दर कमी केल्याने कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला असून सर्वसामान्यांवरील कर्जाच्या हप्त्याचे ओझे कमी होणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने काही महत्वाचे निर्णय घेतले. रेपो दर कमी करण्याबरोबर सर्वसामान्यांवरील कर्जाच्या हप्त्याचे ओझे वाढू नये यासाठी ते न भरण्याची मुभा तीन महिन्यांसाठी देण्यात आली होती. त्या मुदतीत वाढ केली आहे.

आधी मार्च, एप्रिल, मे  या महिन्यांसाठी ही सवलत देण्यात आली होती. आता आणखी तीन महिन्यांसाठी ही मुदत वाढवण्यात आली आहे. म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्टपर्यंत कर्जाचा हप्ता न भरण्याची मुभा असेल. कर्जांवरील व्याज भरण्यास दिलेली स्थगिती आणखी तीन महिन्यांनी वाढवण्यात आलेली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था संकटात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात करताना रेपो दरात ४० बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आली. त्यामुळे रेपो दर आता ४.४ टक्क्यावरुन ४ टक्के करण्यात आला आहे. रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्क्यापर्यंत कमी करण्यात आला आहे.  महागाई दर नियंत्रणात राहील अशी आरबीआयला अपेक्षा आहे.  मात्र, पुढील तीन महिने महागाई कायम राहणार आहे. त्यानंतर पुढील सहा महिन्यांत ही माहागाई कमी होईल, असे शक्तीकांता दास यांनी यावेळी सांगितले.

रेपो आणि रिव्हर्स रेपो दर यातील नेमका फरक ?

देशभरातील बँका जेव्हा रिझर्व्ह बँकेकडून अल्पमुदतीचे कर्ज घेतात त्यावेळी जो दर रिझर्व्ह बँक आकारते त्याला रेपो दर म्हणतात. मात्र, ज्यावेळी बँका आपल्याकडचा जास्त असलेला निधी रिझर्व्ह बँकेकडे अल्पमुदतीसाठी जमा करते, त्यावेळी जो व्याजदर आरबीआय देते त्याला रिव्हर्स रेपो दर म्हणतात.