Crime News : पोलिसांपासून वाचण्यासाठी गुन्हेगार काय शक्कल लढवतील याचा काही नेम नाही. पोलिसांच्या भितीने एका आरोपीने चक्क सिमकार्ड गिळले. आरोपीने गिळलेल्या सिमकार्डमधून पोलिसांनी डेटा मिळवला आहे. झारखंडमध्ये हा विचित्र प्रकार घडला आहे. पोलिसांनी सर्वात मोठ्या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. या विचित्र प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे.
झारखंडमधील जामतारा हे सायबर गुन्ह्यांसाठी ओळखले जाते. आता मात्र, जामतारा सह गिरिडीह देखील सायबर क्राईमचा नवा अड्डा बनला आहे. गेल्या महिनाभरात येथून 50 हून अधिक सायबर गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. गरोदर महिलांना प्रसूती भत्ता मिळवून देऊन त्यांची फसवणूक करणार्या तसेच वीज विभागाचे खोटे अधिकारी दाखवून फसवणूक करणाऱ्या एका नव्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
गिरीडीह पोलिसांनी सायबर गुन्ह्यांविरोधात मोठी कारवाई केली. बेंगाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध ठिकाणी पोलिसांनी छापेमारी केली. या कारवाईत अर्धा डझन सायबर गुन्हेगारांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. बेंगाबाद पोलीस स्टेशन हद्दीतील मानसिंगडीह येथील रहिवाशी राहुल कुमार मंडल, चंदन कुमार, मंदाडीह येथील रहिवासी कृष्णा साओ आणि गांडे पोलीस स्टेशन हद्दीतील मरगोडीह येथील रहिवासी भीम मंडल, आसनबोनी येथील रहिवाशी विनोद मंडल आणि मुकेश मंडल या आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी या गुन्हेगारांकडून 27 मोबाईल फोन आणि 32 सिमकार्ड जप्त केले आहेत. सर्व आरोपी app च्या माध्यमातून लोकांना गंडा घालून त्यांची फसवणूक करायचे. पोलिसांच्या कारवाईदरम्यान एका आरोपीने पुरावे नष्ट करण्यासाठी त्याच्या मोबाईलचे सिमकार्ड गिळले. यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने या आरोपीला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी ऑपरेशन करून आरोपीच्या पोटातून सीमकार्ड बाहेर काढले. यानंतर पोलिसांनी या सिमकार्डचा सर्व डेटा रिकव्हर केला.
आरोपी गर्भवती महिलांना आपलं टार्गेट बनवायचे. गर्भवती महिलांना प्रसूती लाभाची रक्कम म्हणून 6300 रुपये देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन करून त्यांना आपल्या जाळ्यात अडकवायचे. याशिवाय बनावट वीज विभागाचे अधिकारी दाखवून वीज बिलाची थकबाकी जमा करण्यासाठी लोकांना भिती दाखवायचे. थकीत वीजबिल भरण्याच्या नावाखाली ते लोकांची फसवणूक करत होते. हे सर्व गुन्हे ते एका App च्या मदतीने करायचे. app च्या माध्यमातून लोकांचे वॉलेट क्रमांक मिळवून त्यांना कॉल करून ते ऑवालईन गंडा घालायचे. सायबर गुन्हेगार पोस्ट पेमेंटद्वारे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या खातेदारांची फसवणूक करत होते. लोकांना कॉल करुन ते आरोग्य विभाग किंवा वीज विभागाचे अधिकारी असल्याचे भासवायचे. वीज तोडण्याची धमकी देऊन ते ई-वॉलेट क्रमांक मिळवायचे. यानंतर ते लोकांच्या खात्यातून पैसे काढायचे.