निनाद झारे, झी मीडिया, मुंबई: (Stock Market News) आज निफ्टीचा नवा उच्चांक? भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी पुन्हा एकदा नवा उच्चांक प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहे. डिसेंबर 2022 मध्ये निफ्टीने १८ हजार ८८७चा उच्चांक नोंदवला होता. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेल्या नफा वसूली मुळे गेले सहा महिने सातत्यानं चढ उतार होत होते.
मार्च अखेरीला आणि १ एप्रिलला सुरु झालेल्या नव्या आर्थिक वर्षात परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतले आहे. सोबतच एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललीय. त्यामुळे बाजारात नियमित गुंतवणूक करण्यासाठी पैसा येतोय, म्हणून आता पुन्हा बाजार नव्या उच्चांकापाशी येऊन पोहचला आहे.
शुक्रावारी निफ्टी आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर म्हणजेच १८ हजार ८२६ वर बंद झाला आज सकाळपासून आशियाई बाजारात फारशी हालचाल दिसत नसली, तरी सिंगापूरमध्ये लिस्ट असणाऱ्या निफ्टीने नवा विक्रम स्थापन केलाय. त्यामुळे बाजार नव्या उच्चांकावर उघडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील काही दिवसात बाजार १९ हजाराच्या दिशेने जाईल अशी स्थिती आहे.
बाजारात तेजी परतण्याची तीन महत्वाची कारणे आहेत. सर्वात पहिलं आणि अत्यंत महत्वाचे कारणभारतीय गुंतवणूकदारांची एसआयपीमधील गुंतवणूक. गेले तीन महिने महिन्याला १५ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम म्युच्युअल फंडातील होणाऱ्या एसआयपीद्वारे बाजारात येत आहे. एसआयपीद्वारे येणारी ही रक्कम बाजारासाठी अत्यंत महत्वाची का आहे हे यानिमित्ताने समजून घेणे महत्वाचे आहे. जागतिक अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट असल्याने अनेक परदेशी गुंतवणूकदारांनी जिथे नफा आहे तिथील गुंतवणूक जानेवारी २०२३पासून काढून घेण्यास सुरुवात केली. नफा वसुलीच्या या ट्रेंडचा फटका भारतीय बाजारालाही बसला.
डिसेंबर २०२२मध्ये १८ हजार ८८७ची उच्चांकी पातळी गाठणारा निफ्टी १७ हजार ५००च्याही खाली घसरला. पण जागतिक गुंतवणूकदार पैसे काढून घेत असले, तरी भारतीय संस्थात्मक गुंतवणूकदारांची सातत्यपूर्ण खरेदी होत राहिली. त्यामुळे जागतिक घसरणीच्या तुलनेत भारतीय बाजारातील घसरण मर्यादित राहील. दुसरे महत्वाचे कारण, गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीतील भारतीय आर्थिक विकासाचे आकडे सगळ्यांनाच चकीत करणारे ठरले. चालू आर्थिक वर्षातही भारतीय अर्थव्यवस्था आणि शेअर बाजारात लिस्ट असणाऱ्या कंपन्याची नफा कमावण्याची क्षमता कायम असल्याचे परदेशी गुंतणूकदारांच्या ध्यानात आल्याने त्यांनी भारतीय बाजारात पुन्हा एकदा गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.
मे महिन्यात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात साधारण ३१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. शिवाय देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांचा एसआयपीचा ओघ कुठेही कमी झालेला नाही. त्यामुळे दुहेरी खरेदीचा परिणाम म्हणून बाजारात तेजी परतली आहे. तिसरे महत्वाचे कारण, अमेरिका युरोपात महागाई नियंत्रणात आणण्यासाठी उचलेली कठोर पावलं आणि त्यामुळे येऊ घातलेली मंदी या दोन्हीची तीव्रता अपेक्षेपेक्षा कमी असेल असे वातवरण सध्या तयार झाले आहे. मंदीच्या सावटामुळे अमेरिका आणि युरोपात व्यवसाय करणाऱ्या भारतीय आयटी कंपन्यांनाही नफ्यात घट बघावी लागेल अशी भीती बाजाराला होती. आता ही भीती कमी झाल्याने आयटी कंपन्यांमध्ये तेजी परतली आहे.
निफ्टीमध्ये आयटी कंपन्यांच्या शेअरचा वजन जास्त आहे. त्यामुळे टीसीएस, इन्फोसिस सारख्या बड्या शेअर्समध्ये खरेदी आली की निर्देशांक धावू लागतो. त्यातच निफ्टी जरी उच्चांकी पातळीवर असला तरी टीसीएस आणि इन्फोसिससारख्या कंपन्या त्यांच्या उच्चांकी पातळीपासून बऱ्याच खालच्या पातळीवर आहेत. त्यामुळे तिथे तेजीला आणखी वाव आहे. या तिन्ही कारणांचा एकत्रित परिणाम म्हणून निफ्टी आता १९ हजाराच्या दिशेने वाटचाल करतोय.
गेल्या सहा महिन्यात ज्यांनी शेअर बाजारात ज्यांनी गुंतवणूक केली आहे, त्यांना आता नफा दिसू लागला आहे. अशा गुंतवणूकदारांनी आता लगेच संपूर्ण नफा वसूली न करता, काही प्रमाणात नफा वसूल करावा. असं तज्ज्ञांचं मत आहे. ज्यांना नव्याने गुंतवणूक करायची आहे, त्यांनी समभागांची योग्य निवड करून गुंतवणूक करावी. जर बाजारात थेट गुंतवणूकीसाठी द्यावा लागणारा वेळ आपल्याकडे नसेल, तर दोन ते तीन चांगले म्युच्युअल फंड निवडून एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करावी असं मत बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.