जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये दहशतवादी हल्ल्यात 4 जवान शहीद; या वृत्तीचा खात्मा करण्यासाठी लष्करानं उचललं मोठं पाऊल

Doda Encounter Latest Update:  जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी कारवाया वाढल्या असून, डोडा येथील चकमकीमध्ये 4 जवान शहीद झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.   

सायली पाटील | Updated: Jul 16, 2024, 09:01 AM IST
जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये दहशतवादी हल्ल्यात 4 जवान शहीद; या वृत्तीचा खात्मा करण्यासाठी लष्करानं उचललं मोठं पाऊल  title=
Jammu kashmir Doda terror attack Encounter Latest Update

Doda Encounter Latest Update: मागील काही महिन्यांमध्ये जम्मू काश्मीरमध्ये शमलेल्या दहशतवादी कारवायांनी पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं पाहायला मिळालं. श्रीनगरपासून जम्मू काश्मीर आणि काश्मीर खोऱ्यापर्यंत दशतवाद्यांच्या घुसखोरीच्या घटना समोर आल्या असून, आता पुन्हा एकदा या भागामध्ये लष्कर आणि स्थानिक पोलीस दलानं कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार J&K मधील डोडा भागात पुन्हा एकदा दहशकवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक झाली असून, यामध्ये आतापर्यंच चार जवान शहीद झाल्याचं वृत्त आहे. 

सोमवारी सायंकाळी जम्मूच्या संभागमधील डोडा जिल्ह्यातील धारी घोटच्या उरारबागी भागामध्ये सोमवारी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये संघर्ष सुरु झाला. यामध्ये लष्कराचे काही जवान गंभीररित्या जखमी झाल्याचंही म्हटलं गेलं. सदर घटनेनंतर जम्मू काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्करानं तातडीनं जबाबदारी हाती घेत जखमींना रुग्णालयात पाठवत या भागाला छावणीचं स्वरुप दिलं. डोडा महामार्गापासून नजीकरच्या सर्व परिसरामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, या भागामधील प्रत्येक लहानमोठ्या हालचालीवर सुरक्षा दलाकडून करडी नजर ठेवली जात आहे. इथून ये-जा करणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणीसुद्धा केली जात आहे. 

जम्मच्या डोडा जिल्ह्यातील उरारबागीमध्ये असणाऱ्या घनदाट वनक्षेत्रामध्ये अद्यापही हे दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती लष्कराला मिळाल्यामुळं या भागात सध्या शोधमोहिम हाती घेण्यात आली आहे. इथं सीआरपीएफचीसुद्धा मदत घेतली जात असून, सुरुवातीला मिळालेल्या माहितीच्या आधारे इथं लष्कराची कारवाई सुरू असतानाच दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. ज्यानंतर लष्करानंही प्रतिहल्ला चढवला. या संघर्षात लष्कराचे जवान शहीद झाले, तर काहींना गंभीर इजा झाल्याचं वृत्त समोर आलं. 

लष्कराच्या 16 कोरकडून मिळालेल्या माहितीनुसार डोडाच्या उत्तरेला असणाऱ्या जनरल क्षेत्रामध्ये दहशतवादी आसरा घेत असल्याचा सुगावा गुप्तचर यंत्रणांना लागला होता. दरम्यान अद्यापही या भागामध्ये लष्कराची शोधमोहिम सुरू असून या दहशतवादी वृत्तीचा नायनाट करण्यासाठी लष्कर एक पाऊलही मागे येताना दिसत नाहीय.

हेसुद्धा वाचा : फोन तुटला, अलार्म कोणी ऐकला नाही, 48 तास रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये अडकला रुग्ण अखेर...

महिन्याभरात डोडामध्ये झालेला हा तिसरा हल्ला आहे. जून महिन्यातही दोन दिवसांमध्ये इथं दोनदा दहशतवादी हल्ले झाले होते. जिथं लष्कराच्या जवानांवर निशाणा साधत त्यांनी हल्ला चढवला होता. या हल्ल्याचं उत्तर देताना जम्मू काश्मीर पोलिसांच्या मदतीनं सुरक्षा दलानं 3 दशहतवाद्यांचा खात्मा केला होता. 

का वाढताहेत या घटना? 

जम्मू काश्मीरचे डीजीपी आरआर स्वॅन यांच्या माहितीनुसार सध्या इथं पंजाबच्या सीमेहून दहशकतवाद्यांची घुसखोरी वाढली असून, जम्मू काश्मीरमद्ये कार्यरत असणाऱ्या राजकीय पक्षांमुळंच हा सुळसुळाट वाढला आहे. स्वॅन यांच्या माहितीनुसार दहशतवाद्यांना आणि त्यांच्याशी हातमिळवणी करत या कारवायांमध्ये हातभार लावणाऱ्यांचा खात्मा केल्यानंतर त्यांच्या कुटुंबाप्रती सहानुभूती दाखवणं ही बाब इथं आता New Normal झाली आहे. स्वॅन यांनी इथं जमात-ए-इस्लामी या संघटनेचा उल्लेख करत इथं यासारख्या अनेक संस्था धर्माच्या नावाखाली दहशतवादाला खतपाणी घालतात असा गंभीर दावा केला.