Man Killed Father: आतापर्यंत तुम्ही संपत्तीसाठी किंवा इतर एखाद्या गंभीर कारणावरुन झालेल्या वादामधून एखाद्या व्यक्तीने रागाच्या भरता पालकांवर हल्ला केल्याच्या बातम्या ऐकल्या असतील किंवा वाचल्या असतील. मात्र बंगळुरुमध्ये एक फारच विचित्र घटना घडली आहे. येथील एका व्यक्तीने अगदी किरकोळ कारणावरुन आपल्याच वडिलांची हत्या केली आहे. सदर प्रकार हा बंगळुरुमधील बॅनरघट्टा येथे घडला आहे. या हल्ल्यामध्ये 76 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
वेल्लायुद्धान असं मरण पावलेल्या 76 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. वेल्लायुद्धानचा 42 वर्षीय मुलगा विनोद कुमार यानेच आपल्या वडिलांची हत्या केली. या दोघांमध्ये कपडे कोणते परिधान करावेत या विषयावरुन वाद झाला. त्यामधूनच विनोदने वडिलांवर प्राणघातक हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, वेल्लायुद्धानने त्याच्या मुलाला बर्म्युडा परिधान करण्याऐवजी पारंपारिक धोतर नेसण्याचा सल्ला दिल्याने वादाला तोंड फुटलं.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या दिवशी हा सारा प्रकार घडला त्या दिवशी वेल्लायुद्धान त्याच्या मुलाबरोबर मद्यपान करत होता. त्यावेळी विनोदने काय परिधान करावे यावरुन वेल्लायुद्धानने वाद घालण्यास सुरुवात केला. आपण कोणते कपडे घालावे हे आपले वडील सूचवत असल्याने विनोद चांगलाच संतपाला. मद्यधुंदावस्थेत विनोदने आपल्या वडिलांवर हल्ला केला. संतापलेल्या विनोदने आपल्या वडिलांचं डोकं भिंतीवर आपटलं. त्यानंतर वडील जमीनवर पडले असता त्यांच्या पोटात आणि छातीवर विनोदने लाथा घातल्या. विनोदचा धाटका भाऊ विमल कुमारनेच यासंदर्भातील खुलासा केला आहे. वादा झाल्यानंतर विनोदने वडिलांवर चाकूने हल्ला केल्याचंही विमलने सांगितलं आहे.
विनोद हा फार जास्त प्रमाणात मद्यपान करतो, असं विमलने पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं आहे. ज्या दिवशी हा प्रकार घडला त्या रात्री मद्यपान करुयात असं विनोद आणि वेल्लायुद्धान यांनी ठरवलं. विनोदने विमलला 300 रुपये दिले आणि दारु आणण्यास सांगितलं. हे दोघे रात्री एकत्र बसून मद्यपान करत असताना अचानक कपड्यांवरुन या दोघांचा वाद झाला आणि मुलाने वडिलांवर हल्ला केला. हा प्रकार घडला तेव्हा विमल घरात नव्हता. त्याने घरी येऊन वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं तेव्हा त्याने पोलिसांना फोन करुन याबद्दल कळवलं.
पोलिसांनी केलेल्या पाहणीमध्ये मरण पावलेल्या वेल्लायुद्धानच्या शरीरावर चाकूने हल्ला केल्याच्या जखमा नव्हत्या. मात्र डोक्यावरील जखमा आणि अत्याचार झाल्याचं पोलिसांना दिसून आलं. हल्ला केल्यानंतर विनोद फरार झाला होता. मात्र दुसऱ्या दिवशी तो पोलिसांना शरण आला. सध्या पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.