Booster Dose: सिरमने बुस्टर डोससाठी DCGI कडे मागितली परवानगी

देशात कोविडशील्ड लसीचे पुरेसे डोस उपलब्ध आहेत असल्याचं सीरमने म्हटलं आहे

Updated: Dec 1, 2021, 08:50 PM IST
Booster Dose: सिरमने बुस्टर डोससाठी DCGI कडे मागितली परवानगी

Booster Dose Approval : कोरोना विषाणू लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (serum institute of india) बूस्टर डोससाठी (Booster Dose) ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून परवानगी मागितली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने कोविशील्डला (covishield) बूस्टर डोस म्हणजेच तिसरा डोस म्हणून वापर करण्याची परवानगी मागितली आहे.

बूस्टर डोससाठी कोव्हिशिल्डने जोरदार तयारी केली असून देशात कोविडशील्ड लसीचे पुरेसे डोस उपलब्ध आहेत असल्याचं सीरमने म्हटलं आहे. 

DCGI कडे केलेल्या अर्जात, सीरम इन्स्टिट्यूटचे गव्हर्नमेंट आणि रेग्युलेटरी अफेयर्सचे संचालक प्रकाश कुमार सिंग म्हणाले की, UK च्या मेडिसिन्स आणि हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीने AstraZeneca ChAdOx1 nCoV-19 लसीला बूस्टर डोस म्हणून आधीच मंजूर दिली आहे. सीरमने आपल्या अर्जात म्हटलं आहे की जग कोरोनाशी लढत आहे आणि अनेक देशात कोरोनाचे बूस्टर डोस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. 

अधिकृत सूत्रानुसार, सिंग यांनी अर्जात म्हटले आहे की, 'आपल्या देशात कोविशील्ड लसीची कमतरता नाही. कोरोनाचा नवा विषाणू आल्यानंतर ज्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते सुद्धा बूस्टर डोसची मागणी करत आहेत. महामारीच्या वेळी बुस्टर डोसपासून कुणीही वंचित राहू नये, ही काळाची गरज आहे आणि प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याचा हक्कही आहे, असं त्यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने संसदेत माहिती देताना सांगितलं की लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गट आणि राष्ट्रीय तज्ज्ञ गटाशी बूस्टर डोस देण्याबाबत चर्चा करत आहे.