अभियंता आणि डॉक्टरांसाठी भारतातील कोचिंग जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानमधील कोटा येथे रविवारी दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची बातमी समोर येताच खळबळ उडाली आहे. दरम्यान गणितज्ञ आणि सुपर 30 कोचिंग सेंटरचे संस्थापक आनंद कुमार यांनी यावर व्यक्त होताना या आत्महत्यांनी आपण हादरलो असल्याचं म्हटलं आहे. आनंद कुमार यांनी ट्विटरला आपल्या भावना व्यक्त करताना कोचिंग सेंटर्सना विद्यार्थ्यांना आपल्या मुलांप्रमाणे वागणूक देत, सर्वांकडे लक्ष द्या असं आवाहन केलं आहे. तसंच त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा ही फक्त एक चाचणी असून, तुमच्या कौशल्याचं मोजमाप त्यातून केलं जाऊ शकत नाही असं सांगत मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. कोटामध्ये यावर्षी जवळपास दोन डझनहून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हा आतापर्यंत सर्वाधिक आकडा आहे.
"आज फक्त 4 तासात कोटामधील दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या वृत्ताने मला हादरवून सोडलं आहे. मी सर्व कोचिंग संचालकांना आवाहन करतो की, तुम्ही शिक्षणाला फक्त कमाईचं साधन बनवू नका आणि सर्व विद्यार्थ्यांना आपली मुलं समजून त्यांच्यावर लक्ष द्या", असं आवाहन आनंद कुमार यांनी केलं आहे.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन करत सांगितलं आहे की, "मी सर्व विद्यार्थ्यांनाही समजावू इच्छितो की, कोणत्याही परीक्षेत इतकी ताकद नाही की ती तुमच्या प्रतिभेची साक्ष देईल. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी एक नाही तर अनेक मार्ग आहेत. तसंच आई-वडिलांनीही आपली अपुरी राहिलेली स्वप्नं मुलांनी पूर्ण करण्याची अपेक्षा करता कामा नये".
आज फिर से सिर्फ 4 घंटे के अंदर कोटा में 2 बच्चों के आत्महत्या की खबर ने मुझे हिलाकर रख दिया है | मैं तमाम कोचिंग संचालकों से यह अपील करता हूँ कि आप शिक्षा को सिर्फ आमदनी का जरिया नहीं बनाये और सभी बच्चों को अपना बच्चा समझकर उनपर ध्यान दें | और मैं विद्यार्थियों को समझाना चाहूँगा… pic.twitter.com/xV1w0Rva7B
— Anand Kumar (@teacheranand) August 28, 2023
रविवारी मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांपैकी एकजण महाराष्ट्राचा होता. 17 वर्षीय अविष्कार शुभांगी NEET या सामान्य वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करत होता. तर आदर्श राज नावाचा दुसरा मुलगा बिहारचा होता. 27 ऑगस्ट रोजी दोघांनी वेगवेगळ्या घटनांमध्ये आत्महत्या केली.
अविष्कार याने कोचिंग इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारली. तर आदर्श याने भाड्याच्या घरात गळफास घेत जीवन संपवलं.
2022 मध्ये एकूण 15 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. तर दुसरीकडे 2023 मध्ये आतापर्यंत 23 आत्महत्या करण्यात आल्या आहेत. डिसेंबर 2022 हा सर्वात प्राणघातक महिना ठरला. एकाच दिवसात तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. करोनानंतर आत्महत्यांच्या संख्येत 60 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचं आकडेवारीतून दिसत आहे.