आरोग्यमंत्र्यांकडून देशातील कोरोना संसर्गाबाबत मोठा खुलासा

जगात हीच आकडेवारी... 

Updated: Jul 9, 2020, 01:25 PM IST
आरोग्यमंत्र्यांकडून देशातील कोरोना संसर्गाबाबत मोठा खुलासा
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : भारतात वाढती Coronavirus कोरोना रुग्णांची संख्या ही प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांपुढं एक मोठं आव्हान उभं करत असतानाच केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी मात्र देशातील कोरोना संसर्गाबाबत एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा खुलासा केला आहे. 

सध्याच्या घडीला झपाट्यानं होणारा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि त्याचा प्रसार ही चिंतेची बाब असली तरीही भारतात अद्यापही कोरोना व्हायरसच्या सामूहिक संसर्गाची सुरुवात झालेली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. 

'माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तांनुसार सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण असणाऱ्या देशांमध्ये भारत तिसऱ्या स्थानावर येतो. सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये भारत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर येतो. एका मिलियनमागे आपल्या देशात ५३८ कोरोना रुग्ण आहे. तर, जगात हीच आकडेवारी १४५३ इतकी आहे', असं आरोग्यमंत्री म्हणाले. काही स्थानिक भागांमध्ये कोरोनाच्या संसर्गाचं प्रमाण जास्त आहे. पण देशात सामूहिक संसर्ग आढळून आलेला नाही असं आरोग्य मंत्री हर्षवर्धन म्हणाले. 

 

देशात आतापर्यंत १ कोटी ४ लाख ७३ हजार ७७१ कोरोना चाचण्या

 

बुधवारी देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले. चोवीस तासांमध्ये एकूण २४८७९ कोरोना रुग्णांची नव्यानं नोंद झाली. ज्यामध्ये ४८७ मृत्यूही झाल्याचं पाहायला मिळालं. आतापर्यंत देशात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संथ्या २, ६९, ७८९ इतकी आहे. तर, ४, ७६, ३७८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. परिणामी, भारतात कोरोना रुग्णसंख्या सतत वाढते आहे. परंतु कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील वाढत आहे, त्यामुळे ही काहीशी दिलासादायक बाबच म्हणावी लागेल.