खासदार ओमराजे निंबाळकर लावणार मिळालेल्या मतांइतकी झाडं

 खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आपल्याला मिळालेल्या मतांएवढी झाडं लावण्याचा संकल्प केला आहे.

Updated: Jun 6, 2019, 06:31 PM IST
खासदार ओमराजे निंबाळकर लावणार मिळालेल्या मतांइतकी झाडं title=

मुस्तान मिर्झा, झी मीडिया, उस्मानाबाद : उस्मानाबादचे नवनिर्वाचित खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आपल्याला मिळालेल्या मतांएवढी झाडं लावण्याचा संकल्प केला आहे. पर्यावरण दिनाचा औचित्य साधून ओमराजे निंबाळकर यांनी फेसबुकवरील आपल्या अधिकृत पेजवर एक व्हिडिओ जारी करून अशी माहिती दिली आहे. उस्मानाबाद जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. नेहमीच निसर्गाची मार या जिल्ह्याला बसत आहे. त्यामुळे इथला शेतकरी मागील चार-पाच वर्षांपासून दुष्काळामुळे त्रस्त आहे. त्यासाठी जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात झाडे लावली पाहिजे यासाठी उस्मानाबादच्या खासदारांनी त्यांना मिळालेली 6 लाख मतांइतकी झाडं लावण्याचा निर्धार केला आहे. 

पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन ही केवळ सरकारची जबाबदारी नाही .आपण सर्वांनी सामूहिकपणे हे शिवधनुष्य उचलायचे आहे. गतिमान समाजाचा नागरिक आणि सर्वोच्च सभागृहाचा प्रतिनिधी म्हणून  माझ्या कर्तव्याची जबाबदारी घेतोय. मी माझ्या मतदरसंघात मला मिळालेल्या मतांइतकी झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प करत आहे . तब्बल ६ लाख झाडांची लागवड लवकरच उस्मानाबाद  जिल्ह्यात सुरु करत आहोत. असं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हंटल आहे. 

तसेच सर्वांनी एक-एक झाड लावा असं आवाहनदेखील त्यांनी केले आहे. शिवाय इतर खासदारांनी देखील आपल्याला पडलेल्या मतांइतकी झाडं लावावी असा सल्ला त्यांनी दिला आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्याभरात त्यांचं कौतुक होत आहे.