Unseasonal Rain Damage Due : अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे. राज्यात शेतीची दाणादाण उडाली आहे. राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 1 लाख 39 हजार 222 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी, कांदा पिकांसह भाजीपाला पिके आणि द्राक्षे, डाळिंब, केळी, पपईची मोठया प्रमाणावर हानी झाली आहे. शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याने बळीराजा संकटात आहे. तर कोकणात आंबा आणि काजूचे नुकसान झाले आहे.
मात्र राज्यात केवळ 6 टक्केच पंचनामे झालेत. सरकारी कर्मचारी संपामुळे पंचनामे रखडले होते. मात्र आता संप मिटल्यामुळे पंचनाम्यांना वेग येईल अशी अपेक्षा आहे. 4 ते 9 मार्चदरम्यान झालेल्या पावसात 38 हजार 664 हेक्टर तर 15 ते 19 मार्च या दरम्यान दुस-यांदा झालेल्या पावसात एक लाख 558 हेक्टरवर नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसानं मराठवाड्यात दाणादाण उडालीय. तब्बल 82 हजार हेक्टरवरील शेतीचं नुकसान झाले आहे.. मात्र आतापर्यंत केवळ पाच टक्केच पंचनामे झालेत. सरकारी कर्मचा-यांचा संप मिटलाय. त्यामुळे आता तरी ब्रेक लागलेल्या पंचनाम्यांच्या कामांना वेग यावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतायत. तलाठी संघटनेनं पंचनामे करणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र काल दिवसभरात फारसे पंचनामे होऊ शकले नाहीत. किमान आता तरी पंचनामांना वेग येईल अशी बळीराजाला अपेक्षा आहे. मात्र अशाच गतीनं पंचनामे सुरू राहिले तर त्या कामाला दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ जाईल. त्यामुळे प्रशासनानं आपल्या कामाला गती देण्याची गरज व्यक्त होतेय.
नागपूर जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे 7 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाले आहे. त्यात काढणीला आलेल्या गहू, हरभरा, संत्रा, मोसंबी आणि भाजीपाला पिकांना फटका बसलाय. प्राथमिक अहवालानंतर शेताच्या बांधावर जाऊन सर्वेक्षण सुरू झालंय. अंतिम अहवालात नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालंय. काढणीला आलेलं गव्हाचं पीक जमीनदोस्त झाले आहेत. बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. तत्काळ पंचनामे करुन मदतीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर कोकणात आंबा आणि काजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात आंब्याचा हंगाम असताना अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने हाती आलेले आंबापीक गेले आहे. त्यामुळे आंबा आणि काजू बागायतदार चिंतेत आहेत.