Chandrakant Patil Black And White Interview With Nilesh Khare : उच्चशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी झी २४ तासवरील ब्लॅक अँड व्हाईट मुलाखतीत केलेल्या वक्तव्याचे राज्यात मोठे राजकीय पडसाद उमटले आहेत. बाबरी उदध्वस्त करण्यात कोणत्याही शिवसैनिकाचा सहभाग नसल्याचा दावा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी झी २४ तासच्या ब्लॅक अँड व्हाईट मुलाखतीत केला होता. यावरुनच आता मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) मैदानात उतरले आहेत. चंद्रकांत पाटील यांचा दावा मनसेने खोडून काढला आहे.
झी २४ तासला चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या मुलाखतीनंतर मनसेनं एक व्हिडिओ ट्विट केलाय. राज ठाकरेंनी बाबरीसंदर्भात केलेल्या विधानाचा हा व्हिडिओ आहे. अयोध्या रामजन्मभूमी आंदोलनात, बाबरीचा विध्वंस झाल्यानंतर उसळलेल्या धार्मिक उन्मादात जनतेसाठी अभेद्य ढाल बनलेल्या वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या प्रामाणिकपणावर, त्यांच्या शौर्यावर, धैर्यावर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्यांनी सन्मा. राजसाहेबांनी सांगितलेला हा प्रसंग जरूर ऐकावा ! असं म्हणत मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
अयोध्या रामजन्मभूमी आंदोलनात, बाबरीचा विध्वंस झाल्यानंतर उसळलेल्या धार्मिक उन्मादात जनतेसाठी अभेद्य ढाल बनलेल्या वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या प्रामाणिकपणावर, त्यांच्या शौर्यावर, धैर्यावर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्यांनी सन्मा. राजसाहेबांनी सांगितलेला हा प्रसंग जरूर ऐकावा ! pic.twitter.com/6AwTnGRdo2
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 11, 2023
चंद्रकांत पाटलांच्या बाबरी-शिवसेनेसंबंधीच्या दाव्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि चंद्रकांत खैरेंनी सडकून टीका केली आहे. झी २४ तासला चंद्रकांत पाटलांनी दिलेल्या मुलाखतीवर उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटलांची हकालपट्टी करा किंवा मुख्यमंत्री शिंदेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. तर, बाबरी शिवसैनिकांनीच पाडल्याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी केला आहे.
'चंद्रकांत पाटील घरी बसून प्रचार करायचे. आता हे येऊन सांगणार का की बाबरी कुणी पाडली अस घणाघात चंद्रकांत खैरे यांनी केला. चंद्रकांत पाटलांकडे लक्ष देण्याची गरज नाही असेही ते म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेबांचा अपमान केलाय. त्याचा निषेध म्हणून मुख्यमंत्री राजीनामा देणार का असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
बाबरीप्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याशी सहमत असल्याचं राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. एकनाथ खडसेंनी चंद्रकांत पाटलांची पाठराखण केलीय. सगळं झाल्यानंतर शिवसैनिक तिथे आले, असं खडसेंनी म्हटल आहे.
उच्चशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी झी २४ तासच्या मुलाखतीत बाबरीप्रकरणी केलेल्या विधानापासून भाजपनं हात झटकले आहेत. पाटलांची भूमिका ही वैयक्तिक असून भाजपचा त्याच्याशी संबंध नसल्याचं स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
चंद्रकांत पाटील यांची बाळासाहेबांबाबतची भूमिका स्पष्ट आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. सावरकरांबाबत मूग गिळून गप्प बसणा-यांना आता बोलण्याचा काय अधिकार आहे असा सवाल शिंदे यांनी विचारला आहे.