Maharahtra Politics : येत्या काळात महाराष्ट्रात आणखी एक मोठा राजकीय भूकंप होणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस पक्ष देखील फुटणार असल्याची चर्चा रंगली आहे. काँग्रेसमधील आमदारांचा गट भाजपत जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तीन राज्यातील पराभवाचा फटका काँग्रेसला महाराष्ट्रात बसणार आहे. महाराष्ट्रात काँग्रेसची बार्गेनिंग पॉवरही घटणार आहे. परिणामी काँग्रेस पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग होवू शकते.
राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश निवडणुकांच्या निकालांचा फटका महाराष्ट्र काँग्रेसला बसण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीत काँग्रेसची ताकद घटलीय तर राज्यात महाविकास आघाडीत काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर कमी होण्याची चिन्हं आहेत. या निकालानंतर राज्यात लोकसभेसाठीच्या जागावाटपात काँग्रेसचा वाटा कमी झाल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. विशेषत राष्ट्रवादी पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट काँग्रेसला जास्त जागा सोडण्याच्या तयारीत नाहीत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 44 जागांसाठी मविआची बोलणी पूर्ण झालीयेत.. यात ठाकरे गटाला 19 ते 21, काँग्रेसला13 ते 15 तर शरद पवार गटाला 10 ते 15 जागा मिळू शकतात. 4 जागांवर चर्चेतून निर्णय होणार आहे. मात्र आता जागावाटपाची ही समीकरणं बदलू शकतात, काँग्रेसच्या पदरात कमी जागा पडू शकतात.
फक्त जागावाटपातच काँग्रेसला हादरा बसणार नाही तर 3 राज्यांच्या निकालांमुळे काँग्रेसमधील एक गट प्रचंड अस्वस्थ झाल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे हा गट भाजपसोबत जाण्याच्या तयारीत असल्याची माहितीही सुत्रांनी दिलीय.3 राज्यांच्या निवडणुकांचे हादरे काँग्रेसला देशभर जाणवू लागलेत. इंडिया आघाडीतील मित्रपक्षांनीही काँग्रेसवर उघड नाराजी व्यक्त करायला सुरुवात केलीय.
कर्नाटक निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचे काँग्रेसचे मनसुबे होते. मात्र राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश निकालांनी काँग्रेसची सारीच गणितं बिघडवली. आता काँग्रेस या परिस्थितीचा सामना कसे करते हे पाहणं महत्त्वाचं आहे.
काँग्रेसच्या बूथवर बसायला सुद्धा एकही व्यक्ती राहू देऊ नका...बुथ वाटायला सुद्धा माणूस राहिला नाही पाहिजे. प्रत्येक बुथवर पन्नास लोकांचा प्रवेश करा...असं आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजपा पदाधिका-यांना केलंय.