उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, तर, शरद पवार आणि राहुल गांधी... अमित शाहांनी एका दगडात 3 पक्षी मारले

उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत. तर, शरद पवार हे भ्रष्टाचा-यांचे सरदार आहेत. भाजप मेळाव्यात अमित शाहांनी हल्लाबोल केला. तेलंगणा, कर्नाटक, हिमाचलमध्ये खटाखट पैसा द्या असा टोला राहुल गांधींनाही लगावला. 

वनिता कांबळे | Updated: Jul 21, 2024, 07:55 PM IST
 उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, तर, शरद पवार आणि राहुल गांधी... अमित शाहांनी एका दगडात 3 पक्षी मारले title=

Maharashtra Politics : पुण्यातून अमित शाहांनी एका दगडात पक्षी मारले आहेत. अमित शाहांनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधींवर जहरी टीका केली. स्वत:ला बाळासाहेबांचे वारस सांगणारे उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते बनले असा घणाघात अमित शाहांनी उद्धव ठाकरेंवर केला. तर भ्रष्ट्राचाराचे सर्वात मोठे सूत्रधार शरद पवार असल्याची टीकाही अमित शाहांनी केली आहे. तेलंगणा, कर्नाटक, हिमाचलमध्ये खटाखट पैसा द्या असं म्हणत अमित शाहांनी राहुल गांधींनाही टोला लगावला आहे.

मराठा आरक्षणावरून शरद पवारांवर निशाणा

मराठा आरक्षणावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी शरद पवारांवर निशाणा साधलाय... भाजपची सत्ता येते तेव्हा मराठा आरक्षण मिळतं... मात्र शरद पवारांचं सरकार येतं तेव्हा आरक्षण गायब होतं, असं वक्तव्य अमित शाहांनी पुण्यातील भाजप मेळाव्यात बोलताना केलं. मराठा आरक्षण पाहिजे तर भाजपचं सरकार आणा, असं आवाहनही त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला केलं.

अमित शाहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचा खासदार सुप्रिया सुळेंनी घेतला खरपूस समाचार 

अमित शाहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचा, खासदार सुप्रिया सुळे यांनी खरपूस समाचार घेतला.  भाजपने आरोप केलेले डर्टी डझन आज त्यांच्याच सरकारमध्ये मंत्री असल्याकडे लक्ष वेधत, सुप्रिसा सुळे यांनी अमित शाहांच्या टीकेचा समाचार घेतला. त्याचवेळी आपल्याला याबाबत काही माहिती नसल्याचं सांगत, अजित पवारांनी यावर बोलणं टाळलं. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यातून रवाना होण्याआधी आणखी एक बैठक घेतली. पुण्यातील JW मॅरिएट हॉटेलमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून बैठक झाली. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्यासह इतर नेतेही उपस्थित होते.